घोषणा केलीय, पण उमेदवार कुठाय?

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणुकीत 40 टक्के महिलांना तिकीट देण्याची अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. पण काँग्रेसची ही घोषणा हवेत विरते काय अशी चिन्हं आहेत. कारण उत्तर प्रदेशात काँग्रेसला महिला उमेदवारच मिळत नाहीयेत. त्यामुळे भाजपवर मात करण्यासाठी टाकलेला हा डाव काँग्रेसवरच उलटताना दिसत आहे.
उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवसात अधिसूचना जारी होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेसनेही ही निवडणूक मनावर घेतली असून त्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. स्वत: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या उत्तर प्रदेश निवडणुकीत विशेष लक्ष घालत आहे.
विशेष म्हणजे त्यांनी सर्व लक्ष महिला मतदारांकडे केंद्रीत केलं आहे. त्यामुळेच निवडणूक जाहीरनामा जाहीर करताना प्रियंका गांधी यांनी महिलांना 40 टक्के तिकीट देण्याची घोषणा केली होती. प्रियंका गांधी यांनी ही घोषणा केल्यानंतर इतर पक्ष बॅकफूटवर गेले होते. तर दुसरीकडे प्रियंका यांनी केलेली घोषणा काँग्रेससाठी अडचणीचीही ठरताना दिसत आहे. कारण काँग्रेसला राज्यात महिला उमेदवारच मिळताना दिसत नाहीये.
उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या छाननी समितीकडे अर्ज आले आहेत. त्यात महिला उमेदवारांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण निवडणुकीत महिलांना 40 टक्के दिले नाही तर डोकेदुखी वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यास इच्छुकांना सांगितलं होतं. त्यासाठी 11 हजार रुपये शुल्कही ठेवलं होतं. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं दिसून येत आहे.