कोल्हापूरात जिल्ह्यात गारठा वाढला; पारा १२ अंशावर

यंदा ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने (rain) बरेच दिवस ठिय्या मारल्याने गायब झालेली थंडी पुन्हा वाढू लागली आहे. उशिराने पडू लागली असली, तरी तिचा पारा चांगलाच घसरल्यामुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. शहर परिसरात दिवसभर २२ ते २३ अंशापर्यंत तर रात्री दहानंतर १२ अंशापर्यंत पारा घसरला आहे. त्यामुळे थंडीमुळे नागरिकांमध्ये हुडहुडी भरत आहे. दरम्यान, पारा आणखी खाली येऊन थंडी आणखीनच वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
यंदा पाऊस आणि थंडीच्या चक्रामध्ये बदल झाले. विशेषत: दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या दरम्यान सुरू होणाऱ्या थंडीला वेळाने सुरुवात झाली; कारण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘जवाद’ चक्रीवादळांमुळे अवकाळी पाऊस नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाला. शिवाय नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ढगाळ वातावरणामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळे निर्माण झाले. त्यामुळे चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस या समीकरणामुळे थंडीला सुरुवात झाली नाही. अरबी सुमद्रात जेव्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते, तेव्हा भोवती चक्राकारगतीने वारे फिरते. हे वारे बाष्प घेऊन महाराष्ट्राकडे येते. यातून ढगांची निर्मिती होऊन अवकाळी पाऊस पडतो. ऑक्टोबरपासून ही अवकाळी पावसाने थंडीचा मार्ग रोखला गेला.
आग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप बेट समूह याठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. थायलंड परिसरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात आले. लक्षद्वीप बेटापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडत राहीला. परिणामी, थंडी ‘गुल’ झाली. आता अवकाळी पावसाचे सावट कमी झाले. तसेच ढगाळ वातावरण कमी होऊन आकाश निरभ्र झाल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याने शहर परिसर, जिल्ह्यात हुडहुडी तयार झाली. विशेषत: शहरात तर सायंकाळी सहा ते सात नंतर थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. दसरा चौक, महाद्वार रोड येथे कानटोप्या, स्वेटर्स, मफलर घेण्यासाठी रात्री गर्दी होत आहे. चहा, कॉफीच्या सेंटरवरसुद्धा गर्दी वाढली आहे. (rain)
रुग्ण वाढले
यंदा थंडी उशिरा पण कडाका अधिक असल्याने सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढल्याचे दिसत आहे. येत्या तीन दिवसांत थंडी अधिकच वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.