“आयत्यावेळी पाठीत खंजीर खुपसला जात असेल तर…….” राजू शेट्टी यांनी दिला इशारा

आयत्यावेळी पाठीत खंजीर खुपसला जात असेल तर तो उलटा करायला वेळ लागणार नाही, असा इशारा माजी खा. राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये (election) गणपतराव पाटील यांच्या माघारीसाठी स्वीकृतचा कोणताही प्रस्ताव स्वाभिमानीकडे आलेला नाही. स्वाभिमानीला केवळ वापरण्याचा कोणी प्रयत्न केल्यास भविष्यात त्याचे परिणाम भोगावे लागतील, असेही ते म्हणाले.
शेट्टी म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा बँकेत एक जागा देण्याचे आश्वासन दिले होते. अनुसूचित जाती-जमातीची जागा काँग्रेसच्या कोट्यात आहे, ती जागा तुम्हाला आम्ही देऊ शकतो, त्यासाठी अन्य नेत्यांना विचारण्याची आवश्यकता नाही, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले होते. आयत्यावेळी जर पाठीत खंजीर खुपसला जात असेल तर तो खंजीर उलटा करायला आम्हाला वेळ लागणार नाही. स्वाभिमानी संघटनेला एक जागा द्यायला काहीच अडचण नव्हती. त्यामुळे आमचा विचार केला नाही तर आम्हाला देखील पर्याय खुले आहेत.
विकास सेवा संस्था गटाचा येथे विषयच नाही. या गटातील निवडणूक (election) प्रत्येकजण आपापल्या ताकदीवरच लढत असतो. त्याप्रमाणे शिरोळमधून गणपतराव पाटील निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे स्वीकृतच्या पर्यायाचा प्रश्नच येत नाही. त्याबाबतचा स्वाभिमानी संघटनेकडेही कोणी प्रस्ताव दिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरे, आवाडेंचा प्रस्ताव धुडकावला
मंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्यासाठी आ. विनय कोरे व आ. प्रकाश आवाडे आपल्याकडे येऊन गेले. परंतु, त्यांनी दिलेला प्रस्ताव आपण धुडकावून लावल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
शिरोळचा तिढा कायम
गणपतराव पाटील यांच्या माघारीसाठी सर्व नेत्यांनी देव पाण्यात घातले आहेत. परंतु, या गटातून राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज असल्याने शिरोळच्या जागेचा तिढा कायम आहे.