राखी सावंतला धक्काबुक्की, भडकलेल्या सलमाननं शमिता शेट्टीला सुनावलं

बिग बॉस (Big Boss) १५च्या काही दिवसांपूर्वीच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये ‘तिकिट टू फिनाले’ टास्कमध्ये बरेच वाद झाले. नात्यांमध्ये दुरावा आला, भांडणं झाली आणि धक्काबुक्की देखील झाली. अखेर हा टास्क रद्द झाला. त्यानंतर आता ‘विकेंड का वार’चा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शमिता आणि राखी यांच्यात झालेल्या धक्काबुक्कीमुळे सलमान खान संतापलेला दिसत आहे. यावरून सलमान खाननं शमिताला चांगलंच सुनावलं आणि राखीला पाठींबा दिला आहे.

टास्क दरम्यान झालेल्या भांडणामध्ये शमितानं राखीला धक्का दिला होता. यानंतर राखी, तेजस्वी आणि देवोलीना यांच्यासोबत याबाबत बोलताना दिसली होती. आता याच मुद्द्यावरून सलमान खाननं शमिता शेट्टीला चांगलंच सुनावलं आहे. प्रोमो व्हिडीओमध्ये सलमान खान विचारतो, ‘घरात सर्वात अनफेअर कोण वाटतं?’ त्यावर शमिता शेट्टी राखीचं नाव घेते व म्हणते, ‘कारण राखी संचालक असते तेव्हा तिच्या मित्रांचीच बाजू घेताना दिसते.’ त्यावर सलमान म्हणतो, ‘ज्याप्रकारे तू राखीला धक्का दिला ते चुकीचं होतं. तू नेहमी म्हणतेस की उमर नेहमीच चिडलेला असतो. पण शेवटी तू देखील तेच केलंस. ज्याच्या तू नेहमीच विरोधात असतेस.’

याशिवाय सलमान खाननं(Salman Khan) करण कुंद्रा आणि तेजस्वी यांच्या भांडणावर भाष्य केलं. त्यानं करणला विचारलं, ‘तुला राखी अनफेअर खेळत असल्याचं दुःख होतं की तू हा विचार करून हैराण झाला होतास की राखी आणि देवोलीनानं तुला नाही तर तेजस्वीला पाठींबा दिला.’ यावर करण म्हणतो की अशा कोणत्याही गोष्टीचा त्याला फरक पडत नाही. यावर घरातील सर्व सदस्यांसह सलमान खानलाही हसू आवरत नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *