आजच्याच दिवशी रचली गेली होती ‘World Wide Web’ची मुहूर्तमेढ

25 years of the World Wide Web: Internet inventor, Tim Berners-Lee,  explains how it all began - Independent.ie

गोष्ट आहे १९८९ ची. एक ३५वर्षीय तरुण ‘सर्न’ या नावाने ओळखलं जाणाऱ्या ‘युरोपियन ऑर्गनायजेशन फॉर न्युक्लियर रिसर्च’(European Organization for Nuclear Research) या संस्थेत संशोधक सदस्य म्हणून काम करत होता. ‘एका संगणकातील माहिती दुसऱ्या संगणकात पाठवणे’ ही या तरुणावरची मुख्य जबाबदारी. या कामात भरपूर डोकेदुखी होत असल्याने काही तरी करून सगळी माहिती एकाच ठिकाणी कशी एकत्रित करता येईल या विवंचनेत हा तरुण तासनतास विचार आणि प्रयत्न करत बसायचा. यातूनच त्याने इम्फॉर्मेशन मॅनेजमेंट-अ प्रपोजल′ (Information Management-A Proposal) नावाची एक संशोधन पत्रिकाच तयार केली आणि यातूनंच जन्म झाला ‘वेब पेज ब्राऊजर’ (Web page browser) चा आणि पाठोपाठ आलं ‘WWW’ अर्थात वर्ल्ड वाईड वेब (World Wide Web). यामागे ज्याचा मेंदू होता त्या तरुणाचे नाव होते टिम बर्नर्स ली (Tim Berners Lee).

टिमचा जन्म ८जून १९५५ला इंग्लंडमध्ये झाला. ऑक्सफोर्ड विद्यापीठातील‘क्विन्स कॉलेज’मध्ये शिकत असताना मित्रासोबत हॅकिंग करताना पकडला गेल्याने शैक्षणिक कालावधीत त्याच्या संगणक वापरावर कॉलेज प्रशासनाने निर्बंध आणले होते. हल्ली आयुष्यात जरासं काही ‘नकारात्मक’ घडलं की लोकं नैराश्यात जातात-तथाकथित उच्चशिक्षित उच्चपदस्थ मंडळीही टोकाचे निर्णय घेतात पण खरं तर माणूस चुकू शकतोच. कुठलीही समस्या-अपयश हे शेवटचे नसते.
आजारपणामुळे लांबलेले शिक्षण-मंद म्हणणारे शिक्षक-प्रचंड वैचारिक गोंधळ हे सगळं बघता एडिसन तिथंच खचला असता तर? ‘मॅन ऑफ सेंच्युरी’ठरलेला आईन्स्टाईन स्विस फेडरल इन्स्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजीच्या प्रवेश परीक्षेत नापास झाल्यानंतर तिथंच अडकून पडला असता तर? सांगण्याचा मतितार्थ हाच की समस्येतच अनेकदा संधी दडलेली असते-कुठलंही अपयश शेवटचं नसते. टिमनंही त्याच्यावर झालेल्या कारवाईचा आपल्या पद्धतीने फायदाच करून घेतला. ‘संगणक’ वापरावर बंदी घालताय नो प्रॉब्लेम. घरातील टिव्ही-मोटोरोलाचा मायक्रोप्रोसेसर आणि सॉल्ड्रींग आयर्न. जुगाड जुळवत त्याने चक्क स्वत:चा संगणकच बनवून टाकला.

मोठमोठाली संशोधनं अशी काही एका दिवसात होत नाहीत, त्यांची पाळंमुळे ही अशी कुठंतरी रुजलेली असतात. १९८०ला ‘जिनिव्हा’इथल्या एका कार्यालयात काम करत असताना टिमने पहिल्यांदा हायपरटेक्स्टवर आधारित ‘ग्लोबल सिस्टिम’ची संकल्पना मांडली. यामुळे कुणीही बसल्या जागेवरून माहिती शेअर करू शकणार होते. यानंतर १९८९ला जी प्रसिद्ध संशोधन पत्रिका मांडली त्यात टिमने ‘हायपरटेक्स्ट आणि इंटरनेट’ यांना एकत्र जोडलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *