वाळू तस्करीमुळे आणखी एकाचा बळी; ट्रॅक्टरने एकास चिरडले

तालुक्यातील खामगाव शिवारातून ट्रॅक्टरव्दारे अनधिकृत वाळू(Sand) उपसा करून त्याची तस्करी केली जाते. रात्री वाळूची तस्करी करणाऱ्या टॅक्टरने एकाला जोराची धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. तुकाराम बाबूराव निंबाळकर (वय ४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आत्तापर्यंतच्या वाळू तस्करीत हा नऊवा बळी असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, निंबाळकर हे दुचाकीवरून आपल्या गावाहून गेवराईकडे जात हाेते. वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, निंबाळकर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर गावकरी मोठ्या प्रमाणात जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत, रस्त्यावरच मृतदेह ठेऊन ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली. यानंतर पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.याबाबत प्रशासन काही ठोस उपाययोजना करणार की नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी संतप्त जमावाला शांत करत विनंती केल्याने आंदोलन थांबवण्यात आले, अशी माहिती सहायक(Assistant) पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी दिली.