प्राणघातक हल्ल्याची टांगती तलवार; जिल्ह्यात घातला धुमाकूळ

आतापर्यंत केवळ निबीड जंगलातच (forest) दिसणारे गवे, बिबटे आता बागायती आणि दुष्काळी टापूत देखील मनसोक्त हुंदडू लागले आहेत. ग्रामीण भागाबरोबरच सांगली शहरासाठी देखील बिबटे, गवे, लांडगे या श्‍वापदांची धास्ती वाटू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर वनविभाग सुसज्ज होण्याची आणि या विभागाने कमालीचे दक्ष राहण्याची गरज आहे.

केवळ चांदोलीच्या जंगलापुरताच दोन तीन वर्षांपूर्वीपर्यंत मर्यादित वावर असलेला बिबट्यासारखा घातक वन्यप्राणी सांगलीत येऊ शकतो हे वाघासारखी छाती असलेल्या बिबट्याने गेल्या वर्षी दाखवून दिले होते. त्याचवेळेपासून बिबट्याचा बागायती टापूतील वावर अधिकच अधोरेखीत झाला आहे. आधीच सांगली शहर आणि जिल्ह्यातील कृष्णा – वारणा नदीकाठ मगरींच्या धास्तीखाली आहे. दुष्काळी भाभातील मणेराजुरीसारख्या गावात तर गव्याच्या जोडीने गेल्या वर्षी एकच धुमाकूळ घातला होता. तर या सार्‍या पार्श्‍वभूमीवर वनविभागाकडे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा देखील तोकडी पडू शकते हे चित्र समोर आले आहे.

गेल्या वर्षी विश्रामबाग परिसरात गव्याचे दर्शन झाले. त्यावेळी गव्याचा सांगलीत चांगलाच गवगवा झाला होता. नंतर बिबट्याची चर्चा सुरू झाली. बिबट्या हा अत्यंत चपळ आणि तितकाच धोकादायक! भक्ष्याचा गळा फोडण्याची त्याची उपजतच प्रवृत्ती अत्यंत धोकादायक ठरते. मात्र हे सारेच वन्यप्राणी नागरी वस्तीच्या जवळ येऊ लागले आहेत नव्हेतर नागरी वस्तीत शिरकाव करू लागले आहेत.

खरे तर विकासाच्या नावाखाली लाखो वृक्षांची होणारी कत्तल, रस्ते, महामार्गासाठी फोडले जात असलेले डोंगर यातून या वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ लागला आहे. यातूनच अन्नसाखळी संपुष्टात आल्याने हे वन्यप्राणी जणू सैरभैर झाले आहेत. यातून आता गवा, बिबट्या नागरी वस्तीत दिसणे यात नवलाईचे काहीच राहिलेले नाही. जंगलात होणारी खुलेआम अवैध लाकूडतोड, सातत्याने होणार्‍या लहान प्राण्यांच्या चोरट्या शिकारी यातून जंगलातील (forest) नैसर्गिक समतोल बिघडू लागला आहे.

तर वन्यप्राण्यांची संपन्न अन्नसाखळी मोडली जात आहे. यातूनच अन्नाच्या शोधासाठी हे भुकेले वन्यजीव नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. बिबट्या जंगलातून कधीचाच बाहेर पडला आहे. वाळवा तालुक्यातील वारणा काठच्या ऊसशेतीत देखील बिबट्या आढळत असेल तर त्याची जबाबदारी कोणाची, हा सवाल उपस्थित झाल्याखेरीज राहत नाही. मुळात चांदोलीच्या जंगलात गवा आणि बिबटे तसेच गवे यांची संख्या किती हे अधिकृत तरी आकडे आहेत का, या प्रश्‍नांचे उत्तर नकारार्थीच यावे!

‘वनिकी’ वर वाढती जबाबदारी

तत्कालीन वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आपली ताकद पणाला लावून कुंडल येथे वनविभागाची प्रशिक्षण अकादमी सुरू केली. या ‘वनिकी’ मध्ये तज्ज्ञ मनुष्यबळ, अत्याधुनिक यंत्रणा सारे सारे अगदी सज्ज आहे. विशेष म्हणजे ‘वनिकी’ कृष्णा नदीपासून फार लांब अंतरावर आहे असे देखील नाही. खरे तर ‘वनिकी’च् या वतीने वन्यप्राणी नागरी वस्तीत शिरकाव करत असताना जागृती करणे, वन्यप्राण्यांची माहिती देणे, भरवस्तीत वन्यप्राणी शिरलाच तर त्याला जेरबंद करणे, यावेळी घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे बनले आहे.

अतिक्रमणांनी अधिवास येतोय धोक्यात

मगर, गवा आणि आता बिबट्या हे वन्यप्राणी आता बिनधास्तपणे आणि खुलेआम नागरी वस्तीत बिनधास्तपणे शिरकाव करू लागले आहेत. वारणा – कृष्णा पात्रात मगरींचा तर सुळसुळाट आहे. गवा हा तर निबीड जंगलातील प्राणी! पण गवा देखील आता डिग्रज, सांगलीवाडीत देखील येऊ शकतो हे केवळ कल्पनाकरण्यासारखेच पण आता प्रत्यक्षात साकारू लागले आहे. हे चित्रच सामान्यांसाठी भीतीदायक ठरू लागले आहे.

सर्वेक्षण कधी…संरक्षण कोसो मैलावर…

प्रामुख्याने सन 2005 च्या महापुरापासून कृष्णा नदीत गेल्या दहा-बारा वर्षांपासून मगरींनी ठाण मांडले आहे. मगरींनी अनेकवेळा शेतकरी, मुलांवर जीवघेणे हल्ले केले आहेत. मात्र आजअखेर या मगरींचा बंदोबस्त करणे वनविभागाला शक्य झालेले नाही. केवळ नदीतील मगरींचे सर्वेक्षण करण्याची मोहीम तेवढी वनविभागाने राबवली, मात्र नंतर त्याचे पुढे काहीच झाले नाही.! आता तर गव्याने, बिबट्याने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे.

वाळवा तसेच शिराळा तालुक्यात बिबट्याने अनेक ठिकाणी पाळीव जनावरांचा फडशा पाडला होता. मात्र वनविभाग केवळ पंचनामे करण्यात धन्यता मानत आहे. सुदैवाने बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्याच्या जिवावर बेतलेले नाही. मात्र बिबट्यांचा सर्वत्र सुखनैव सुरू असलेला संचार पाहता बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्याची टांगती तलवार विशेषत: नदीकाठच्या शेतकर्‍यांवर कायमचीच राहिली आहे. यात आता गव्याची भर पडली आहे. मात्र यासाठी नागरिकांनी काय दक्षता घ्यावी याची माहिती वनविभागाने देणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *