केळीच्या पानातील ग्रिल्ड पापलेट

साहित्य :
- पापलेट
- हळद – २ टीस्पून
- जाडं मीठ – १ टीस्पून
- साधं मीठ – चवीनुसार
- केळीचं पान – १
- मोहरी तेल – १ टीस्पून
- थोडं नेहमीचं वापरातलं तेल
वाटणाकरिता
- आलं – १ इंच
- लसूण – ४/५ पाकळ्या
- हिरवी मिरची – १ ते २ (आवडीनुसार )
- पुदिना – ८ ते १० पानं
- कोथंबीर – अर्धा कप
- काळी मिरी – अर्धा टीस्पून
- अर्ध्या लिंबाचा रस
कृती:
- साफ केलेल्या पापलेटला, जाड मीठ आणि १ टीस्पून हळद(Turmeric) लावून चोळावे आणि १५ मिनिटं ठेवून द्यावे.
- आम्ही काळा पापलेट घेतलाय. त्याला खवले थोडे जास्त असतात. जाडं मीठ चोळल्यामुळे जर काही खवलं राहिली असतील तर निघायला मदत होईल आणि मासा धुण्याआधी हळद लावल्याने त्याचा हिंवसपणा कमी होईल. जर सिल्वर पापलेट असेल, तर याची गरज पडणार नाही.
- मासा स्वच्छ धुवून घ्यावा आणि प्रत्येक १ इंचावर चीर द्यावी.
- चवीनुसार मीठ आणि १ टीस्पून हळद लावावी.
- आलं, लसूण, पुदिना, कोथंबीर, मिरची, मिरी आणि लिंबाचा रस बारीक वाटून घ्यावं.
- वाटण माश्याला लावून घ्यावे आणि माशाच्या चिरांमध्ये नीट भरून घ्यावं.
- केळीचं पान तव्यावर रंग बदलेपर्यंत भाजून घ्यावे.
- आता पानात वाटण लावलेला मासा गुंडाळून घ्यावा आणि सर्व बाजू टूथपिक लावून बंद कराव्यात किंवा दोऱ्याने बांधाव्यात.
- मासा निदान अर्धा तास मॅरीनेट होऊ द्यावा.
- ग्रीलपॅनला थोडा तेल लावून त्यावर मासा १५ ते २० मिनिटं माध्यम आचेवर भाजून घ्यावा. केळीच्या पानाच्या किती लेयर आहेत यावर हा वेळ कमी जास्त होऊ शकतो.
- दुसरी बाजूही यानुसार भाजून घ्यावी.
- मासा पानातून काढून एका ताटात घ्यावा. एका वाटीत जळता निखारा घेऊन त्यावर मोहरी तेल सोडून धूर करावा. वरून झाकण ठवून २ ते ३ मिनिटं बंद करावे. अप्रतिम स्मोकी फ्लेवर येतो.
- आवडत असल्यास पापलेटला थोडं बटर लावावं. वरून लिंबू पिळून सर्व्ह करावे.