“इतका अभ्यास बरा नाही, त्याचं ओझं झेपलं पाहिजे”

(political news) विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवर अभ्यास करून निर्णय देतो असं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलं होतं. राज्यपालांच्या या आश्वासनावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. इतका अभ्यास बरा नाही. त्यांच ओझं झेपलं पाहिजे, असा चिमटा संजय राऊत यांनी राज्यपालांना काढला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. राज्यपाल आपले फार अभ्यासू आहेत. त्यांना प्रत्येक विषयाचा अभ्यास करावा लागतोय. इतका अभ्यास बरा नाही. त्या अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे. इथे मुळात लॉकडाऊन काळात अभ्यास कमी झाला आहे. आता प्रत्येक गोष्टीत अभ्यास करायला लागलात. आपल्या संविधानात काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार काम करायचं आहे. घटनेत स्पष्ट लिहिलंय की मंत्रिमंडळाच्या शिफारशी तुम्ही मान्य करायच्या आहेत, असं राऊत म्हणाले.

शांतता नाटक सुरू आहे

आता 12 आमदारांच्या शिफारशी. त्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्या शिफारशी बंधनकारक आहेत. आपल्या संविधानात लिहिलं आहे. पण राज्यपालांचा अभ्यास सुरू आहे. शांतता अभ्यास सुरू आहे असं नवीन नाट्य राजभवनात सुरू आहे. आणि त्याचे पात्र जे आहे ते केवळ राज्यपालच नाहीत तर भाजपचे नेतेही त्या नाट्यात भाग घेत आहेत. आता काही दिवस नाटक चालेल. नाटक रंगू द्या. कारण आता 50 टक्के क्षमतेची आसन व्यवस्था असल्याने अशा प्रकारची नाटकं होतं असतात, असा टोलाही त्यांनी लगावला. (political news)

भाजपला देणगी देऊन देश कसा मजबूत होणार?

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या देणग्याच्या आवाहनावरूनही त्यांनी टीका केली. देणग्या आम्हालाच द्या, इतरांना देऊ नका हा संदेश आहे. सामान्य जनतेला आवाहन असलं तरी ते उद्योपतींसाठी आहे. प्रधानमंत्र्यांनी देणग्या द्या असं म्हटलं गेल त्यावर आक्षेप घेतले जाऊ शकतात, पण मी घेणार नाही. भाजपला देणगी देऊन देश मजबूत कसा होणार? असा सवाल त्यांनी केला.

हा अप्रत्यक्ष इशाराच

कायद्यानुसार देणगी मागितली जाऊ शकतेय मात्र प्रधानमंत्र्यांनी देणगी मागणं हे नैतिकतेला धरुन नाही. प्रधानमंत्री सहाय्यता निधीला पैसे मागण्याऐवजी पीएम केअरला मागितला. आता भाजपसाठी देणगी मागितली आहे. आम्हाला पैसे द्या. विरोधकांना पैसे देऊ नका हा संदेश आहे त्यात. दुसऱ्यांना पैसे दिल्यास आम्ही लक्ष देऊ, असा अप्रत्यक्ष इशाराच या आवाहनात असल्याचा दावा त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *