सेंच्युरियन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रंगाला पावसाचा ‘खेळ’!
भारत(India) विरुद्ध द. आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. पण सेंच्युरियनमध्ये भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे अद्याप सुरू झालेला नाही. सेंच्युरियनमध्ये रात्रभर पाऊस पडला असून अजूनही मधूनमधून रिमझिम पाऊस पडत आहे. आजचे पहिले सत्र पावसामुळे वाहून गेल्याचे चित्र आहे.
सेंच्युरियनमधील हवामान(Weather) खराब आहे आणि सतत पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सायंकाळी ७ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार) पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचवेळी, तापमान २० अंश सेल्सिअस आहे असून वा-याच्या वाहण्याचा वेग ताशी १८-२० किलोमीटर आहे.
दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या कसोटीत दमदार सुरुवात केली आहे. रविवारी पहिल्या दिवशी सलामीवीर के. एल. राहुलच्या मस्त मस्त शतकाच्या जोरावर भारताने 3 बाद 272 अशी जबरदस्त कामगिरी केली आहे. कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक झळकावणारा राहुल 122 धावांवर नाबाद असून, अजिंक्य रहाणे 40 धावांवर त्याला साथ देत आहे.
मयंक अग्रवालनेही अर्धशतक झळकावताना 60 धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहली 35 धावांवर बाद झाला. तर, चेतेश्वर पुजाराच्या नशिबी भोपळा आला. द. आफ्रिकेचा एन्गिडी (3/45) हा एकमेव यशस्वी गोलंदाज ठरला.
तत्पूर्वी, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या सत्रात एकही गडी बाद होऊ न देता 83 धावांची खेळी केली. दुसर्या सत्रात लगेचच मयंकने दमदार अर्धशतक ठोकले. तसेच, संघानेही शतक गाठले. मार्को जॅन्सेनच्या 29.1 व्या षटकात मयंक अग्रवालने चौकार लगावून आपले अर्धशतक पूर्ण केले.