‘गोकुळ’वेळी आघाडीने सेनेचा वापर केला; संजय मंडलिकांचा आरोप

गोकुळच्या (Gokul)निवडणुकीत सर्वांची मनधरणी करत शिवसेनेने (Shivsena) महाविकास आघाडीला पाठबळ दिले. पॅनेलचे नेतृत्व मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) व सतेज पाटील (Satej Patil) यांनी केले. पॅनेल त्यांच्यामुळे विजयी झाले मग त्या वेळी शिवसेनेने काय रांगोळ्या काढल्या का, असा सवाल खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी केला. तुरंबे (ता. राधानगरी) येथे राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
मंडलिक म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांमध्ये सेनेला भरभरून दिले, असे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणतात; मात्र जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ यांची झोळी भरून फाटेल एवढे सेनेने दिले. ते देत असताना आमचे हातही काढून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. सेनेचा फक्त वापरच करण्याचा विचार विरोधी आघाडीचा असल्यामुळे ही निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. यात आमचा विजय निश्चित आहे.’
खासदार मंडलिक म्हणाले, ‘‘आम्हाला वापरण्याची भूमिका घेतल्यामुळे शिवसैनिकांना वाचवण्यासाठी समविचार आघाडी रिंगणात आणली आहे. जिल्हा बँकेत कर्जवाटप चुकीच्या पद्धतीने झाले. उधळपट्टी होती म्हणून प्रशासक आले. बँकेवर प्रशासक असताना पडत्या काळात चांगले काम केले. ७५०० कोटीचे उद्दिष्ट गाठले. चांगले काम केलेल्या संचालकांना कुणाच्या तरी हट्टापायी उमेदवारी देताना बाहेरचा रस्ता दाखवला. शिक्षक, पदवीधर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सेनेने दोन्ही काँग्रेसला भरभरून साथ दिली. महाविकास आघाडीने जिल्हा परिषदेत सेनेची ताकद आहे म्हणून पदे दिली आहेत.’’

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या राजकारणात राज्यातील स्थितीनुसार एकत्र राहण्याचा विचार होता. बिनविरोधसाठी प्रयत्न होते. आम्ही वैचारिक ताकदीने रिंगणात आलो आहोत.’’

जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी कागलचा शाहू कारखाना बिनविरोध आणि जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे नेते बिनविरोध झाले कसे असा सवाल करत ही निवडणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेसने लादली आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसून स्वार्थासाठी त्यांनी भाजपला जवळ केले असून याचा जाब त्यांना विचारावा लागेल.’’

जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी जिल्ह्याच्या जनतेने शिवसेनेला सहा आमदार दिले. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद असताना जिल्हा बँकेत आम्हाला डावलून भाजपला जवळ करणं शिवसेना कधीही सहन करणार नाही.’’

माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, ‘‘संजय मंडलिक यांना अनेक ऑफर आल्या पण त्यांनी त्या धुडकावल्या. जिल्ह्याच्या राजकारणात घोडेबाजार सुरू आहे, हा कोणी सुरू केला, एका महाशयांनी पालिकेच्या निवडणुकीत झालेला घोडेबाजार मान्य केला. सतेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे धोक्याचं आहे.’’
माजी आमदार संपतराव पवार पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा बँक ही कोणा एकाची नाही तर मातीशी इमान बाळगणाऱ्या शेतकऱ्यांची आहे.’’

मारुतराव जाधव, वीरेंद्र मंडलिक, सुजित मिणचेकर, नंदकिशोर सूर्यवंशी, बापूसाहेब भोसले, नंदकुमार ढेंगे, सुरेश कुराडे, हंबीरराव पाटील, मुरलीधर जाधव, अरुण जाधव, अशोक फराकटे, शहाजी कांबळे, फत्तेसिंग भोसले पाटील, दत्तात्रय उगले, के. जी. नांदेकर, अर्जुन आबिटकर, प्रदीप खोपडे, अतुल जोशी, विश्वनाथ तहसीलदार, बी. जी. देवर्डेकर आदी उपस्थित होते.
मंत्री हसन मुश्रीफ शिवसेनेला भरभरून दिले असे म्हणतात परंतु जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आहे. गोकुळ, जिल्हा परिषदेत एकत्र किंवा आमदार असल्यामुळे ही पदे दिलेली नाहीत तसे असते तर शिवसेनेला तुम्ही मोजलेही नसते ते जिल्ह्याचे नेते आहेत मात्र काही निर्णय घेताना ते कचरतात असा टोला आमदार प्रकाश आबिटकर यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *