जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील रुग्णांसाठी (patient) दिलासादायक बातमी आहे. आरोग्यसेवेला अत्याधुनिकतेची जोड देणारे डिजिटल पेट स्कॅन यंत्र कोल्हापुरात दाखल झाले आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांसह आरोग्य विज्ञानाच्या विविध विद्याशाखांमध्ये अचूक निदानासाठी उपयुक्त ठरणारे पुणे ते बेंगलोर या पट्ट्यामध्ये हे पहिले यंत्र आहे. यामुळे आता या यंत्राद्वारे निदानाची आवश्यकता असलेल्या रुग्णांना कोल्हापूरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी अत्यंत जलद रोगनिदानाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडी येथे ‘न्यूक्लिअस डिजिटल पेट सिटी अँड मोलेक्युलर इमेजिंग सेंटर या नावाने उभारलेल्या संस्थेने हा उपक्रम जनसेवेसाठी खुला केला आहे. रोगनिदानाच्या क्षेत्रामध्ये सतत नावीन्याचा शोध घेणारे डॉ. राजेंद्र चिंचणीकर, डॉ. मनजित कुलकर्णी, डॉ. रोहित रानडे आणि डॉ. संतोष कुलगोड या वैद्यकीय व्यावसायिकांच्या समूहाने ‘युनायटेड इमेजिंग’ या अमेरिकन कंपनीचे अत्यंत अत्याधुनिक समजले जाणारे हे यंत्र या प्रकल्पामध्ये स्थापित करण्यात आले असून त्याला मानवी शरीरातील अवयवांची कार्यक्षमता, दोष यांचा वेध घेणार्या ‘गॅमा कॅमेरा’ या यंत्राची जोड देण्यात आली आहे. या नव्या सुविधेमुळे कोल्हापूरच्या आरोग्य विश्वामध्ये एक नवे दमदार पाऊल पडले आहे.
कर्करोगाच्या रुग्णांमध्ये पेशींची वाढ, रोगाचा टप्पा आणि त्याची पसरलेली व्याप्ती यासह औषधोपचारानंतर मिळालेला प्रतिसाद पाहण्यासाठी ‘पेट सिटी स्कॅन’ या यंत्राची आवश्यकता असते. यंत्राच्या अचूक माहितीच्या आधारे केलेले निदान उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. मोठी भांडवली गुंतवणूक असलेले हे यंत्र महानगरांमध्ये उपलब्ध असल्याने रुग्णांची (patient) गैरसोय होत होती. त्याचबरोबर बहुतेक ठिकाणी वापरात असलेल्या यंत्रांचे काम ‘अॅनालॉग’ पद्धतीने होत असल्याने यंत्राची गती आणि अचूकता यांना मर्यादा होत्या. कोल्हापुरात नव्याने स्थापित झालेल्या या यंत्रामध्ये गती आणि अचूकतेच सुंदर मिलाफ तर आहेच. शिवाय, निदानासाठी वापरण्यात येणार्या किरणोत्सारी पदार्थाचे प्रमाणही तुलनेने कमी असल्याने किरणोत्सर्गाचा त्रासही मर्यादित आहे.
‘न्यूक्लिअस इमेजिंग’मध्ये बसविण्यात आलेल्या या यंत्राद्वारे रुग्णाच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखांपर्यंत स्कॅन करण्यासाठी पारंपरिक यंत्राला लागणार्या 20 मिनिटांच्या तुलनेत अवघ्या पाच मिनिटांचा कालावधी लागतो. शिवाय, पारंपरिक यंत्रातील चार मिलिमीटरपर्यंतच्या गाठीचा शोध घेण्याची अचूकता या नव्या यंत्रात एक मिलिमीटरपर्यंत नेण्यात आली आहे. या यंत्राद्वारे कर्करोगाच्या उपचारात अचूकता आणता येते. शरीरातील बुरशीजन्य आजारांचा वेध घेता येतो. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यावर उपचार करण्यापूर्वी हृदयाची कार्यक्षमता आणि निकामी झालेल्या भागाचा वेध घेऊन उपचार पद्धतीचे नियोजन करता येणे शक्य होते. याशिवाय शरीरातील ग्रंथी, हाडे, मणके व अन्य अवयवांतील दोषांचे निदानही होऊ शकते.