सांगली : मुलगा होण्यासाठी केले अघोरी कृत्य

(crime news) माहेरून हुंडा आणण्यासाठी साक्षी राहुल हसबे (वय 33) या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी प्रमोदिनी वसंत हसबे आणि स्वप्नील वसंत हसबे (दोघे रा. विकास कॉलनी, वारणाली) या दोघा संशयिताविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे. या दोघांनी साक्षीला मुलगा होण्यासाठी मांत्रिकाला बोलावून तंत्र, मंत्र करीत अंगारा खाण्यास दिला असल्याचे पुढे आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास संथगतीने सुरू असून मांत्रिक अद्याप मोकाट आहे. साक्षी यांचा राहुल यांच्याशी विवाह झाल्यापासून सासू प्रमोदिनी आणि दीर स्वप्नील यांच्याकडून त्रास सुरू आहे. साक्षी हिने माहेरातून हुंडा घेवून येण्यासाठी दोघांनी मागणी केली.

त्याशिवाय कर्ज काढून गाडी घेऊन दे, असा तगाता लावला आहे. साक्षी यांना पहिली मुलगी आहे. आता तिला मुलगा व्हावा, यासाठी या दोघांनी तगादा लावला होता. त्यासाठी कोल्हापूर येथील एका मांत्रिकाला वेळोवेळी बालावून घेतले. मंत्र-तंत्र सांगत काळ्या जादूसह अघोरी प्रयोग केला.

पाणी, चहा यामधून अंगारा खाण्यासाठी दिला. करणी काढण्यासाठी लिंबूही दिले. साक्षी यांनी विरोध करूनही संशयितांनी हे कृत्य करण्यास भाग पाडले. त्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे साक्षी यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, मुलगा होण्यासाठी अघोरी कृत्य करणारा मांत्रिक मात्र अद्याप मोकाट आहे. त्याच्यावर पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. या प्रकरणाचा तपास संथगतीने सुरु आहे. (crime news)

सुशिक्षित कुटुंब, तरी अंधश्रद्धा

हसबे यांचे कुटुंबिय सुशिक्षित आहे. साक्षी आणि त्यांचे पती शासकीय नोकरीत आहेत. सासू प्रमोदिनी या शासकीय नोकरीतून निवृत्त झालेल्या आहेत. तरीही त्या साक्षी यांना मुलगा हवा यासाठी मांत्रिकाला बोलावून तंत्र, मंत्र उपचार करीत होत्या. साक्षी व त्यांचे पती यांनी विरोध करूनही त्या ऐकत नव्हत्या, त्यामुळे साक्षी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *