क्षारपड जमीन सुधारणेसाठी मदत करून शेतकऱ्यांचे हित जोपासणार: गणपतराव पाटील यांची ग्वाही

शिरोळ (प्रतिनिधी) :
नापिक जमीन सुधारण्याची दृष्टी शेतकऱ्यांत निर्माण होण्याची गरज आहे. क्षारपड जमीन सुधारणे विषयी शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृती निर्माण झाली असून शिरोळमधील शेतकरी नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी पुढे आले आहेत. नापिक जमीन सुधारली तर यातून आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. भविष्यात जमिनी वाढणार नाहीत, मात्र शेतकऱ्यांचे हित जोपासले पाहिजे यासाठी क्षारपड जमीन सुधारणेसाठी लागेल ती मदत आपण करू, अशी ग्वाही श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिले.
शिरोळ परिसरातील क्षारपड जमीन सुधारण्याच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्यातील हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा, असेही आवाहनही त्यांनी केले.
शिरोळ येथील श्री बुवाफन महाराज क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प संस्थेच्या मार्फत ५०० एकर जमीन सुधारणा कामाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
रावसाहेब देसाई म्हणाले, जमीन क्षारपड झाल्यामुळे एका पिढीला त्याचा त्रास सहन करावा लागला. जर या जमिनी सुधारल्या तर आमच्या पुढील पिढ्या समाधानाने जगू शकतील ही दृष्टी घेऊन शेतकरी एकत्र येऊन क्षारमुक्तीचे काम करीत आहेत ही समाधानाची गोष्ट आहे. या कामाला दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी संपूर्ण पाठबळ दिले आहे, त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होत आहे. एक अप्रतिम असे काम दादांच्या माध्यमातून होत असल्याचे पाहून आनंद वाटतो.
नगरसेवक तात्यासाहेब पाटील यांनी स्वागत केले. माजी सरपंच दरगू गावडे यांनी आभार मानले. यावेळी दत्त साखर कारखान्याचे शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, बाबुराव मोरे, रवी कोळी, बाळासो चव्हाण, विजय कवठेकर, दीपक माने, लियाकत सनदी, हरी कोरे, बाबा पाटील- नरदेकर, गुरुदत्त देसाई, अण्णासाहेब चौगुले, संजय चव्हाण, अक्षय माने, कॉन्टॅक्टर कीर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे, अमित माने, हैबती जगताप, रमेश पाटील, विवेक फल्ले, विजय पाटील, जयसिंग माने, विजय पुंदे यांच्यासह शेतकरी, मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *