रस्त्यावर वाढदिवस; बारा जणांवर गुन्हा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती लॉकडाऊन असताना जिल्हाधिकार्‍यांनी जमावबंदी आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर वाढदिवस घालणार्‍या बारा जणांवर कराड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवार दिनांक 9 रोजी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकर्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास यापुढेही कारवाई असेच सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जमीर मुजावर, सलीम मुजावर (वय 43, रा. पालकर वाडा, मंगळवार पेठ, कराड), हमीत शेख (रा. कार्वे नाका, कराड), नसीर शेख (रा. बैल बाजार रोड, मलकापूर, कराड) समीर पटवेकर (रा. मंगळवार पेठ, कराड) आश्पाक सुतार (रा. मंगळवार पेठ, कराड) बशीर पठाण (रा. मंगळवार पेठ, कराड) यासह इतर अनोळखी पाच ते सहा जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी लॉकडाउनच्या अनुषंगाने जमावबंदी आदेश दिले आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करून रविवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागील बाजूस मंगळवार पेठ येथे रस्त्यावर दुचाकीवर केक ठेवून वाढदिवस साजरा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस कर्मचारी सागर भोसले यांनी इतर पोलिसांसह घटनास्थळी जाऊन खात्री केली असता रस्त्यावरती जमाव जमवून जमीर सलीम मुजावर यांचा वाढदिवस साजरा केला जात असल्याचे दिसले.यावेळी पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार जमावबंदी असल्याने तुम्हाला रस्त्यावर वाढदिवस साजरा करता येणार नाही. कोरोनाच्या अनुषंगाने कराड शहरात लॉकडाऊन असून नागरिकांना घराबाहेर न निघण्याबाबत सूचित केलेले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास निर्बंध घालण्यात आले असून तुम्ही रस्त्यावर वाढदिवस साजरा करू नका असे पोलिसांनी सांगितले.

मात्र तरीही पोलिसांचे काहीही न ऐकता जमावाने केक कापून रस्त्यावरच वाढदिवस साजरा केला. त्यामुळे याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात संशयितांवर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सराटे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *