…मग शाळा सुरू ठेवण्यावरच निर्बंध का?
कोरोना व ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे शाळा बंदचा निर्णय झाला आहे. तो चुकीचा व दुर्दैवी आहे. शासनाने निर्बंध शिथिल करून सर्व प्रकारची दुकाने मॉल्स, बससेवा, रेल्वे, मद्यालये, हॉटेल्स, भाजी मंडई, विवाह समारंभ, निवडणुका व राजकीय पक्षांच्या मेळाव्यास परवानगी दिली आहे. असे असताना शाळा सुरू ठेवण्यावरच निर्बंध का ? असा सवाल कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघाने केला आहे. शासनाने शाळा बंद करू नये, या मागणीचे निवेदन शिष्टमंडळार्फे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना देण्यात आले.शिक्षण क्षेत्र व अर्थ तज्ज्ञांनी शाळा सुरू करण्यात याव्यात, अशा प्रकारची मते व्यक्त केली आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. मुले अभ्यासापेक्षा मोबाईलवर गेम खेळण्यात वेळ घालवत आहेत. दुर्गम ठिकाणी, वाड्या-वस्त्यांवर मोबाईल नाही व रेंज, नेटवर्कची समस्या आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शाळा सुरू करण्यास व मुलांच्या शिक्षणात गती आणण्यात विलंब झाल्यास एका पिढीचे नुकसान होणार आहे. परीक्षाविना मुले पास होत असल्याने त्यांना भविष्याबाबत कोणतेही गांभीर्य राहिलेले नाही. पालकांमध्येही असंतोष आहे. त्यामुळे एक दिवस आड अथवा शिफ्टमध्ये शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस. डी. लाड, वसंतराव देशमुख, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, व्ही. जी. पोवार, बाबासाहेब पाटील, पी. एस. हेरवाडे, राजेश वरक, सुधाकर सावंत उपस्थित होते.