‘गोकुळ’च्या संचालकांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
आंदोलनात भाषण करताना नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याचा जाब विचारात एकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी गोकुळच्या संचालकांसह सहा जणांविरोधात गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा (crime) नोंद झाला आहे.
गोकुळचे संचालक बयाजी शेळके, सहदेव कांबळे (रा. कोदे), शिवाजी राऊत (रा. निवडे), निलेश म्हाळुंगेकर (रा. निवडे), सूर्यकांत पडवळ (रा. मांडुकली पैकी खोपडेवाडी), तुकाराम पाटील (रा. कोदे) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मणदूर (ता. गगनबावडा) येथील ज्ञानदेव बापू कांबळे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यातील (crime) संशयितांनी ज्ञानदेव कांबळे यांना कारमध्ये बसवून साळवण येथील अरविंद खाटीक यांच्या दुकानासमोर आणले. दुकानात गोकुळचे संचालक बयाजी शेळके होते. शेळके यांनी मोबाईलमध्ये फिर्यादीने करोना लसीच्या सक्तीविरोधात काढलेल्या आंदोलनातील भाषणाचा व्हिडिओ ज्ञानदेव कांबळे यांना दाखवला. फिर्यादी कांबळे यांनी एका नेत्याचा एकेरी उल्लेख केला होता. नेत्याचा एकेरी उल्लेख का केला? असा जाब विचारत संशयित सहदेव कांबळे याने फिर्यादीच्या दोन्ही पायावर काठीने मारहाण केली. त्यानंतर शेळके, पडवळ, पाटील, राऊत, म्हाळुंगेकर या संशयितांनी फिर्यादी ज्ञानदेव कांबळे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच ‘तुला गावात राहू देणार नाही’ अशी धमकी दिली, असा दावा फिर्यादीकडून करण्यात आला आहे.