शिरोळ पुरवठा विभाग व रेशन धान्य दुकानांचा कारभार चव्हाट्यावर

जांभळी (ता. शिरोळ) येथील गीतादेवी अॅग्रो प्रोसेसिंग मिलमध्ये गव्हाची 40 पोती उतरली असून त्याची रितसर आवक जावक रजिस्टरला नोंद झाली आहे. या प्रकरणी टेम्पो चालक राजेंद्र उगारे यांनी स्पष्ट खुलासा केला आहे. तरी सुद्धा पुरवठा विभागाने केलेल्या पंचनाम्यात ज्वारीची पोती मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे. या अजब प्रकाराने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिरोळ पुरवठा विभाग व रेशन धान्य दुकानांचा (grain shop) कारभार चव्हाट्यावर येणार या भीतीने दुकानदार, गीतादेवी कंपनीचे मालक आणि पुरवठा विभागाने संगनमत करीत बेबनाव केला आहे व लाखो रुपयांचा ढपला पाडल्याची तक्रार परिवर्तन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्याकडे केली आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी कवितके यांनी शासनाचा रास्त भाव दुकानातील गहू काळ्या बाजारात विक्री या प्रकरणी ठोस पावले उचलली जाणार आहेत. यामध्ये सहभागी असणार्याची न्यायालयातून सुटका होणार नाही, अशी तयारी करण्यात आल्याचे आश्वासन कवितके यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान जयसिंगपूर येथील विकास सेवा सोसायटीच्या रास्त भाव दुकानातील (grain shop) बेकायदा कामकाज प्रकरणी 2,3,5 या तीन रेशन दुकानांची अनामत रक्कम जप्त करून परवाने रद्द का करू नये, अशी नोटीस जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लागू केली आहे. दुकानाची तपासणी केली असता ठरवून दिलेल्या परवान्यापेक्षा 71 पोती धान्य जादा आढळले. दुकानात इतके धान्य कोठून आले, कोणाचे होते, याची खोलवर चौकशी करणे महत्त्वाची आहे.
परंतु अगदी नाममात्र कारवाई करून गव्हाच्या ठिकाणी ज्वारीची पोती असा प्रकार दाखवून शासन,संघटना, नागरिक, पदाधिकारी यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न पुरवठा विभागाने केला आहे. शासनाचा गहू काळाबाजारात विक्री करणार्या जिल्ह्यातील 78 रेशन दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. यात 7 रेशन दुकाने रद्द आणि 5 अर्थ घाऊक रॉकेल केंद्र रद्द करण्यात आली आहेत.याशिवाय 38 दुकानदारांच्या अनामत रक्कम जप्त व 12 परवाने रद्द झाले आहेत.
त्याचबरोबर काळ्याबाजारात रॉकेलचे पाच टँकर पकडण्यात आले होते. यावरून गोरगरिबांचे रेशन काळ्या बाजारात विक्री करणार्या मनोवृत्तीचा पर्दाफाश होत आहे. शिरोळ तालुक्यात याहून अधिक भीषणता आहे. तरीही डोळेझाक केली जाते, असा आरोप शिधापत्रिकाधारकातून होत आहे