कोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई

(crime news) सव्वातीन कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी गुरुवारी कोल्हापुरातील रमणमळा परिसरात सापळा रचून जप्त करण्यात आली. कोल्हापुरात अशाप्रकारे ही पहिलीच कारवाई आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुगंधी द्रव्य, सौंदर्य प्रसाधने आणि काही औषधांसाठी व्हेल माशाच्या उलटीला मोठी किंमत आहे.

वन विभाग आणि पोलिस विभागाने संयुक्त कारवाई केली. ही उलटी त्यांनी नेमकी आणली कोठून? याचा शोध सुरू असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील विश्वनाथ नामदास, आलमशाह मुल्ला, उदय जाधव, रफीक सनदी, किस्मत नदाफ, अस्लम मुजावर (सर्व रा. सांगली जिल्हा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. या कारवाईत सव्वातीन कोटींच्या उलटीसह एक चारचाकी, दोन दुचाकी व पाच मोबाईल असा एकूण 3 कोटी 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सांगली जिल्ह्यात व्हेल माशाची उलटी विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती कोल्हापूर वन विभागाला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. या टोळीवर वन विभागाने लक्ष केंद्रित केले. वन विभागाचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना सक्रिय करण्यात आले होते. त्यांनी माहिती जमा करत टोळीतील प्रमुखांशी संपर्क साधला तेव्हा कोल्हापुरातील काहीजण ही उलटी विकत घेण्यास इच्छुक असल्याचे भाटे यांनी त्याला सांगितले. (crime news)

भाटे गेेले दोन दिवस या टोळीच्या संपर्कात होते. त्यातून खरेदीचा व्यवहार करण्यासाठी गुरुवारी या टोळीला कोल्हापुरात येण्यास सांगितले. त्यानुसार या टोळीतील एकजण दसरा चौकात आला. करवीरचे वनक्षेत्रपाल आर. एस. कांबळे बनावट ग्राहक बनून दसरा चौकात आले. उलटी खरेदी करायची आहे, असे सांगून कांबळे यांनी आपल्याजवळील बॅगेतील पैसे त्याला दाखवले.

बॅगेत मोठी रक्कम पाहताच, संशयिताचा विश्वास बसला. त्याने टोळीतील अन्य सदस्यांना उलटी घेऊन येण्यास सांगितले. त्यांनी ग्राहकाला घेऊन रमणमळा परिसरात या, असा निरोप दिला. दरम्यान, वन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक रमणमळा परिसरात येऊन थांबले. वन विभागाचेही एक पथक तिथे आले.

सायंकाळी सातच्या सुमारास या टोळीतील अन्य सदस्य रमणमळा परिसरात आले. त्यांनी सोबत आणलेली व्हेल माशाची उलटी दाखवली. संशयितांनी दाखवलेली व्हेल माशाचीच उलटी असल्याची खात्री होताच परिसरात दबा धरून बसलेले वन विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी या सहाजणांच्या मुसक्या आवळल्या.

कोल्हापूरचे उपवनसरंक्षक आर.आर. काळे यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक वनसंरक्षक सुनील निकम, नवनाथ कांबळे, विजय पाटील, संदीप शिंदे, आर. एस. मुल्लाणी, एस. एस. हजारे यांच्यासह सहायक फौजदार नेताजी डोंगरे, उत्तम सडोलीकर, रणजित कांबळे, वैशाली पाटील, प्रदीप भोसले या पोलिसांनी कारवाईत भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *