विराट कोहलीची सटकली, प्लेयर्सनी मैदानात केला ‘राडा’

(sports news) केपटाऊन कसोटीत (Capetown test) दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गरला (Dean elgar) नाबाद ठरवण्याच्या निर्णयावरुन काल मैदानात वातावरण चांगलचं तापलं होतं. कॅप्टन विराट कोहलीसह (Virat kohli) रविचंद्रन अश्विन, केएल राहुल यांनी स्टंम्पजवळ जाऊन आपला संताप व्यक्त केला. स्टंम्पमधल्या मायक्रोफोनमुळे हे खेळाडू काय बोलले, ते संपूर्ण जगाला कळलं. केपटाऊनमध्ये मालिकेतला तिसरा आणि निर्णयाक कसोटी सामना सुरु आहे. आज या सामन्याचा निकाल लागेल. सामन्यातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर 21 व्या षटकात डीन एल्गरचा पायचीत ठरवण्याचा निर्णय डीआरएस सिस्टिम वापरुन फेटाळून लावण्यात आला. त्यावरुन या भारतीय खेळाडूंनी मैदानावर राडा घातला.

विराट कोहली संघाचा कॅप्टन असताना, त्याने जाणूनबुजून जी कृती केली, ती सोशल मीडियावर अनेकांना पटलेली नाही. या वर्तनासाठी आयसीसी विराट, राहुल आणि अश्विन यांच्यावर कारवाई सुद्धा करु शकते. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य दिले आहे. पीटरसन आणि एल्गरची जमलेली फोडणं आवश्यक होतं. मालिकेचा निकाल निश्चित करणाऱ्या या सामन्यात एका महत्त्वाच्या वळणावर डीआरएसच्या आधारे एल्गरला नाबाद ठरवलं. त्यामुळे भारतीय खेळाडूंना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत.

मैदानात नेमकं काय घडलं?

तिसऱ्यादिवसाच्या अखेरच्या सत्रात डीन एल्गर आणि कीगन पीटरसनची जोडली जमली होती. ते संघाला विजयी लक्ष्याच्या दिशेने नेत होते. त्याचवेळी अश्विनच्या एका चेंडूवर एल्गरला फसला. भारतीय संघाने पायचीतचे अपील करताच मैदानावरील पंच माराईस इरास्मस यांनी एल्गरला आऊट दिले.

एल्गरने रिव्ह्युचा निर्णय घेतला. पण मैदानावरील पंचांचा निर्णय बदलला जाईल, असे त्याला वाटत नव्हते. रिप्ले पाहिल्यानंतर एल्गर ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाला होता. बॉल ट्रॅकिंग टेक्नोलॉजीने चेंडू स्टंम्पसवरुन जातोय, असं दाखवलं.

आर. अश्विन, विराट कोहली आणि केएल राहुलला बॉल ट्रॅकिंग टेक्नोलॉजीवर विश्वास बसला नाही. तिसऱ्या पंचांनी एल्गरला नाबाद ठरवलं. त्यानंतर या तिघांनी स्टंम्पजवळ जाऊन आपला संताप व्यक्त केला. जेणेकरुन सर्वांना समजेल. खरंतर हे टाळता आलं असतं. (sports news)

अश्विन काय म्हणाला?

‘जिंकण्यासाठी तुम्ही दुसरे चांगले मार्ग शोधा सुपरस्पोर्ट’ असं अश्विनने सुनावलं. सामन्याचे प्रक्षेपण करणारे या बॉल ट्रॅकिंग टेक्नोलॉजीची व्यवस्था करतात. दक्षिण आफ्रिकेत सामन्याचे प्रक्षेपण सुपरस्पोर्ट करत आहे. त्यांनी काही तरी फेरफार केला, असं अश्विनचं म्हणण होतं.

केएल राहुल काय म्हणाला?

‘अकरा जणांविरोधात संपूर्ण देश खेळतोय’, असे केएल राहुलने म्हटलं. राहुल भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. तिसऱ्या पंचांनी घरच्या संघाला म्हणजे दक्षिण आफ्रिकेला फेवर केलं, असं राहुलचं म्हणणं होतं.

विराट कोहली काय म्हणाला?
विराट कोहली स्टंम्पसजवळ जाऊन म्हणाला. “फक्त विरोधी टीमवरच नाही, तर तुमच्या संघावरही लक्ष द्या. नेहमी लोकांना पकडण्याचा प्रयत्न करत असता”

कोहली एवढ्यावरच थांबला नाही, तो स्टंम्पसजवळ जाऊन बोलत होता. जेणेकरुन स्टंम्पसच्या मायक्रोफोनमुळे ते सर्वांना ऐकू जाईल. ‘वेल डन डीआरएस वेरी वेल डन’ हे विराटचे शब्द होते.

कॅप्टन म्हणून विराट कोहली आणि अन्य भारतीय खेळाडूंच हे वर्तन सोशल मीडियावर अनेकांना पटलेलं नाही. त्यांनी टि्वटरवरुन भारतीय खेळाडूंना फटकारलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *