कोरोनाबाबत मुख्यमंत्री कठोर निर्णय घेतील
राज्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने भितीदायक स्थिती दिसत नाही. पण अचानक ऑक्सिजनची गरज भासण्यास सुरूवात झाली तर यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेतील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
पुणे जिल्हा बँक आणि पुण्यातील कोरोनाच्या आढावा बैठक अजित पवार घेणार आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यात रुग्णालयात बेडची कमतरता आणि ऑक्सिजनची गरज भासल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर पावले उचलतील.याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करत आहेत. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा आकडा वाढत आहे. यावर आमचे लक्ष असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात लसीची खूपच टंचाई जाणवत आहे. दोन-तीन दिवस पुरतील इतकेच डोस शिल्लक आहेत. लसीअभावी लहान मुलांचे लसीकरण रेंगाळले असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. लसीचा पुरेसा साठा पुरविण्याची मागणी पंतप्रधानांच्या बैठकीत केली असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावर अजित पवार म्हणाले की, राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्या तुलनेत लसीकरण कमी पडत आहे यावर आम्ही लवकरच मार्ग काढणार आहोत. याविषयी आमचे केंद्राशी बोलणे सुरू आहे. राज्यातील लसीकरण लवकरच मोठ्या संख्येने सुरू होईल, असेही ते म्हणाले