भाजपची पहिली यादी जाहीर

देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यापैकी सध्या भाजपची सत्ता असणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे ते अयोध्येतून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर केशव प्रसाद मौर्य हे सीराथू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्यावतीने पत्रकार परिषद घेवून पहिल्या टप्यातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यावेळी बोलताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी, आम्ही पहिल्या टप्प्यात 57/58 आणि दुसऱ्या टप्प्यात 38/55 जागांवर उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले.

यापुर्वी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्यावतीने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 50 महिला उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या या यादीत उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईचाही समावेश आहे.

उत्तर प्रदेशमध्ये एकूण सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारी रोजी मतदार पार पडणार असून, दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारी, तिसऱ्या टप्प्यात 20 फेब्रुवारी, चौथ्या टप्प्यात 23 फेब्रुवारी, पाचव्या टप्प्यात 27 फेब्रुवारी, सहाव्या टप्प्यात 3 मार्च आणि अखेरच्या सातव्या टप्प्यात 7 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *