मायावतींनी वाढदिवशी ५३ उमेदवारांची यादी केली जाहीर

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची (Uttar Pradesh Assembly Election 2022) रणधुमाळी सुरु आहे. दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती (Mayawati) यांनी आज आपल्या वाढदिनी पत्रकाराशी बोलताना, उत्तर प्रदेशातील २०२२ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा बहुजन समाज पक्ष सत्तेत वापसी करेल, असा दावा केला. यूपीत बसपाचे सरकार बनेल. आमचे सरकार प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी काम करेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मायावतींनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून निवडणुकीसाठी ५३ उमेदवारांची नावे जाहीर केली. पहिल्या टप्प्यातील उर्वरित ५ जागांसाठी लवकरच उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मायावतींनी पुढे म्हटले की, यूपी विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील ५८ पैकी ५३ जागांवरील उमेदवार निश्चित केले आहेत. आज मी माझ्या वाढदिनी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर करत आहे. उर्वरित ५ जागांवरील उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जातील. समाजवादी पक्षाने केवळ यादवांची काळजी घेतली. पण आमच्या पक्षाने दलितांसोबतच यादव, मुस्लिम आणि मागास सर्व जातींची काळजी घेतली आहे.

अल्पसंख्याकांना उद्देशून त्या म्हणाल्या की, समाजवादी पक्षाने उमेदवारांच्या पहिल्या यादीत मुस्लिम समाजाला स्थान दिलेले नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. तर बसपाच्या पहिल्या यादीत मुस्लिमांची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

दरम्यान, समाजवादी पक्षात गेलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी काल शुक्रवारी मायावती (Mayawati) यांच्यावर हल्लाबोल केला होता. आपण पक्ष सोडून गेल्यानंतर बसपाची अवस्था वाईट झाली आहे. यावर मायावती यांनी मौर्य यांना जोरदार उत्तर दिले आहे. ‘बहुजन समाज पक्षात आल्यावर स्वामी प्रसाद मौर्य यांचे भाग्य उजळले होते. भाजपवाल्यांनी त्यांना ५ वर्षे सांभाळले.’

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचा बसपामध्ये प्रवेश करण्याबाबतच्या प्रश्नावर मायावती यांनी, कोणत्याही पक्षासोबत युती केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आचारसंहितेमुळे बसपाचे कार्यकर्ते आमच्या वाढदिनी गरिबांची मदत करु शकणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.उत्तर प्रदेशमध्ये एकूण सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारी रोजी मतदार पार पडणार असून, दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारी, तिसऱ्या टप्प्यात 20 फेब्रुवारी, चौथ्या टप्प्यात 23 फेब्रुवारी, पाचव्या टप्प्यात 27 फेब्रुवारी, सहाव्या टप्प्यात 3 मार्च आणि अखेरच्या सातव्या टप्प्यात 7 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *