तिसरी लाट.. ग्रामीण भागाच्या दिशेने

करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या या दोन्ही लाटांमध्ये संसर्गाने आधी शहरांमध्ये विळखा घातला आणि नंतर त्याचा प्रसार ग्रामीण भागांमध्ये होत गेला. तिसऱ्या लाटेमध्येही हेच चित्र कायम आहे. मुंबई आणि परिसरात वेगाने पसरत चाललेल्या ओमायक्रॉनच्या तिसऱ्या लाटेची पावले आता ग्रामीण भागाकडेही वळू लागली आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येही हळूहळू करोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागला आहे. ओमायक्रॉनचे स्वरूप सौम्य असले तरी झपाटय़ाने वाढणारे रुग्णसंख्येचे आकडे ग्रामीण भागात कोणती स्थिती निर्माण करतील, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.

डिसेंबरपासून राज्यात सुरू झालेल्या ओमायक्रॉनच्या तिसऱ्या लाटेने मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांमध्ये उच्चांक गाठला आहे. मुंबईत तर दैनंदिन रुग्णसंख्येने याआधीचे सर्व उच्चांक मोडत २० हजारांचा टप्पा गाठला. राज्यात सध्या २ लाख २१ हजार उपचाराधीन रुग्ण असून यातील सुमारे ८९ टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे केवळ मुंबई, ठाणेच नव्हे तर जवळील रायगड, पालघर येथेही संसर्गाचा प्रसार वाढत आहे.

१ लाख ५२३ रुग्ण (४५ टक्के) मुंबईत आहेत. याखालोखाल ठाणे (२३ टक्के), पुणे (१२ टक्के), रायगड (४ टक्के) आणि पालघर (४ टक्के) या जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे येथे संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आठवडाभरात रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. यासोबतच रायगडमध्येही उपचाराधीन रुग्णांची संख्या आठवडाभरात १ हजार २३५ वरून ९ हजार १४७ वर गेली आहे, तर पालघरमध्ये ती १ हजार ६०५ वरून ८ हजापर्यंत वाढली आहे.

राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत मागील दोन दिवस घट होत असली तरी या महिन्यात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या सुमारे २८ हजारांवर गेली आहे. डिसेंबरमध्ये हे प्रमाण सुमारे १ हजार ४१२ होते. बारा दिवसांत रुग्णसंख्या अनेक पटींनी वाढली आहे. ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही आठवडाभरात जवळपास तीन पटीने वाढली आहे.

४ जानेवारीपर्यंत राज्यात ६६ हजार ३०८ रुग्ण उपचाराधीन होते. ११ जानेवारीपर्यंत ही संख्या २ लाख २१ हजारांवर गेली आहे. या लाटेची व्याप्ती आता वाढत असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. यात प्रामुख्याने नाशिक, नागपूर, सातारा, नगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या आठवडाभरात जवळपास पाच पटीहून अधिक वाढून ५ हजार ३४४ वर गेली आहे, तर नागपूरमध्ये आठ पटीने वाढून ५२६ वरून ४ हजार १४७ वर गेली आहे. सातारा आणि नगरमध्येही उपचाराधीन रुग्णांच्या संख्येमध्ये जवळपास तीन पटीने वाढ झाली आहे.

राज्यभरात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख सर्वाधिक मुंबईत असला तरी बाधितांचे प्रमाण ठाण्यामध्ये सर्वात जास्त आहे. ठाण्यात बाधितांचे प्रमाण सुमारे ३० टक्के तर मुंबईत २८ टक्के आहे. याखालोखाल पालघर (२५ टक्के), रायगड (२३ टक्के) आणि पुणे (२० टक्के) या जिल्ह्यांचा समावेश आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाणही १० टक्क्यांच्या वर गेले आहे. या जिल्ह्यांव्यतिरिक्त नाशिक, अकोला, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण १० टक्क्यांच्याही वर गेले आहे.राज्यात आता अन्य जिल्ह्यांमध्येही तिसरी लाट हळूहळू पसरत असल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईत तिसऱ्या लाटेचा प्रभाव जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात कमी होण्यास सुरुवात होईल, परंतु राज्यात मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात तिसरी लाट उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यानुसार राज्यभरात खाटांचे नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *