अंतर्गत सुरू असलेली धुसफूस आता चव्हाट्यावर

कार्यकारिणी सभा घ्या, त्यानंतर महामंडळाची सर्वसाधारण सभा घ्या, यासाठी मुख्य कार्यालयाला टाळे ठोकण्याची व पोस्टरबाजीतून आपले प्रश्‍न मांडण्याची वेळ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या सभासदांवर आली आहे. आपल्या समस्या मांडण्यासाठी केलेल्या पोस्टरबाजीमुळे महामंडळातील अंतर्गत वाद (argument) चव्हाट्यावर आला आहे.

गेल्या पाच वर्षांतील लेखाजोखा सर्वसाधारण सभेत न मांडता तो आता पोस्टरबाजीच्या माध्यमातून मांडला जात आहे. पाच वर्षांत महामंडळाने अनेक चांगले उपक्रम राबविल्याचे सांगितले जात आहे. पुणे व कोल्हापूर येथे महामंडळाला नवीन कार्यालय मिळाले. अजून खूप काही उपक्रम राबविल्याचे सांगितले जात आहे. या सर्व गोष्टी इतक्या खर्‍या आहेत, तर मग सभासदांसमोर संचालक मंडळ का जात नाही? कार्यकारिणी सभा न होण्याइतपत आपल्याच संचालक मंडळाचा विश्‍वास का गमवावा लागला आहे.

यापूर्वी काम केलेल्या भास्कर जाधव, कै. यशवंत भालकर, अजय सरपोतदार, विजय कोंडके, विजय पाटकर यांच्या काळातही सभासदांमधील वाद विकोपाला गेले. आरोप-प्रत्यारोप झाले. पण यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत बाळा जाधव, सुशांत शेलार वाद सर्व सभासदांनी प्रथमच पाहिला.

गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत सुरू असलेली धुसफूस आता पोस्टरच्या माध्यमातून चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे महामंडळ सभासदांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे की राजकीय मंडळींचा अड्डा झाले आहे, अशी चर्चा सभासदांमधून होत आहे.

गेल्या वर्षभरापासून संचालक मंडळातील अंतर्गत वाद (argument) सोशल मीडियावरही चांगलेच चर्चेत आले आहेत. तरीही एकमेकांना बघून घेण्याची भाषा यापूर्वी कधीच झाली नव्हती. आता कार्यालयाचे कुलूप कधी निघणार, कार्यकारिणी बैठक कधी होणार आणि सर्वसाधारण सभा होणार की नाही, याची वाट सभासद बघत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *