कोल्हापूर : कोरोनाच्या सावटात अवैध व्यवसाय सुसाट

(crime news) मार्च 2020 पासून लॉकडाऊनचे वारे घोंघावत राहिले. कोरोनामुळे सर्व व्यवहार, शाळा, महाविद्यालये, कार्यालये बंद करण्याची वेळ आली. पण अवैध धंदेवाले या काळातही मोकाट सुटले होते. कोरोनाच्या सावटात प्रत्येकजण आर्थिक संकटाचा सामना करत असताना जुगार, दारूच्या कारवायांमध्ये पोलिसांनी तब्बल 13 कोटींचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. कारवाईचा कोणताही धसका नसणारे हे अवैध व्यावसायिक अधिक सुसाट बनले आहेत.

कोरोनाने व्यावसायिक, नोकरदार, फेरीवाले सगळेच चिंतेत आहेत. याउलट अवैध धंद्यांना मात्र ऊत आल्याचे चित्र आहे. जुगार, मटका, दारूमध्ये पैसे उधळणार्‍यांची कमी नसल्याने अशा अवैध व्यावसायिकांची चलती सुरू आहे. मागील दोन वर्षांत गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असले तरी कारवाईचा डोसही तितकाच तीव्र असल्याचे दिसते.

2020 मध्ये जुगाराचे 627 गुन्हे दाखल करून पोलिसांनी 2 कोटी 80 लाखाचा मुद्देमाल जप्‍त केला होता. तर याच वर्षात दारूबंदीचे 1682 गुन्हे दाखल करून यामध्ये 2 कोटी 68 लाखांचा माल हस्तगत करण्यात आला. या वर्षात एकूण 5 कोटी 49 लाखांचा मुद्देमाल या दोन्ही प्रकाराच्या गुन्ह्यात जप्‍त झाला होता. (crime news)

2021 मध्ये लॉकडाऊनमधून बाहेर पडल्याने अवैध व्यावसायिक अधिकसह मोकाट झाले. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये वाढ होत, जुगाराचे 1010 गुन्हे दाखल झाले. यामध्ये 3 कोटी 68 लाखांचा मुद्देमाल, जुगार, मटक्याचे साहित्य जप्‍त करण्यात आले. तर दारूबंदीच्या कारवाईत 2603 गुन्हे दाखल करताना 3 कोटी 70 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

दोन्ही वर्षांत जुगार, मटका, दारूबंदीच्या 5922 गुन्ह्यांची नोंद होऊन यामध्ये तब्बल 12 कोटी 88 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *