राणेंना अटक करणारे पोलिस गप्प का?,

मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो” असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं होतं. त्यांच्याविरोधात भाजपचे बडे नेते आक्रमक झाले आहेत. त्यावरूनच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. केंद्रीय मंत्र्यांना रातोरात अटक करणारे पोलिस कुठे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.शारीरिक उंची वाढल्यामुळे बौद्धीक उंची वाढते असं नाही. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोदींविरोधात किती राग आहे, हे दिसतंय. जे नाना पटोले बोलले ते काँग्रेसचे विचार आहेत. हे लोकशाहीला घातक आहेत. पटोलेंनी केलेलं वक्तव्य म्हणजेच गुन्हा आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करायलाच पाहिजे. नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यापेक्षा ते नाना पटोलेंनी केलेलं वक्तव्य भयंकर आहे. केंद्रीय मंत्र्यांना रातोरात अटक करणारे पोलिस आता गप्प बसले आहेत. ते का कारवाई करत नाही? निवडक काम सुरू आहे. पोलिस ज्या राज्यात निवडक होतात त्या राज्याची अधोगती होते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते टीव्ही ९ मराठी सोबत बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला राबडी देवी म्हटलं तेव्हा आमच्या कार्यकर्त्याला रात्रीतून अटक करण्यात आली. नाना पटोले पंतप्रधानांना थेट धमकी देतात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला नाही. या राज्यात माणूस पाहून कायदा चालतो अशी परिस्थिती आहे. पटोलेंनी वक्तव्य केलं त्या गावात एकही मोदी नावाचा माणूस नाही. ते घाबरले आहेत. ते ज्याप्रकारे बोलत आहेत, त्यांनी मोदींविरोधात वक्तव्य केलं. देशाच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नेत्यावर कारवाई व्हायला पाहिजे. ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. हे त्यांचं कर्तव्य आहे, असंही फडणवीस म्हणाले.
भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या. यावेळी काही नागरिकांनी त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. त्यांच्यासोबत चर्चा करताना नाना पटोले म्हणाले, ” मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो.” त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा येथे तक्रार दाखल केली आहे. तसेच नागपुरात बावनकुळे यांनी पटोलेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.