आमदार रोहित पवार : कर्जतच्या जनतेच्या विश्वासाला पात्र राहू
कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व काॅंग्रेसने एकत्र येत निवडणूक लढवली. तेथील जनतेने आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाला पात्र राहू, अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी दिली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार रोहित पवार म्हणाले, १७ पैकी १५ जागांवर आमचे उमेदवार विजयी झाले आहेत. विकासाचा मुद्दा आम्ही तेथे मांडला होता. आणि त्याच विचाराने त्या ठिकाणी तेथे आम्ही काम करू.उपमुख्यमंत्री अजित पवार, काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही लढत लढलो. यापुढेही अशाच पद्धतीने विकासाच्या मुद्द्यावर एकत्रित निवडणुकांना सामोरे जावू. विकासाचा मुद्दा मांडला तर तो लोकांना भावतो, हे या निकालातून स्पष्ट झाले. लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेत त्याची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर लोक पाठीमागे उभे राहतात, हे या निकालाने दाखवून दिले असल्याचे ते म्हणाले.दरम्यान, कर्जतमध्ये बुधवारी हाती आलेल्या निकालात माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनेलला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना अवघ्या दोन जागा मिळाल्या.