भारत ‘या’ महिन्यात पुन्हा निर्बंधमुक्त?
ओमिक्रॉन (omicron) व्हेरिएंट आणि करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेबाबत अनेक अभ्यासकर्त्यांनी वेगवेगळी मते मांडली असतानाच महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. भारतातील बहुतांश भागात फेब्रुवारीच्या मध्यावर ओमिक्रॉन रुग्णसंख्या पीक गाठेल, असा अंदाज जोशी यांनी व्यक्त केला आहे.
देशात ओमिक्रॉनमुळे करोनाची तिसरी लाट आली आहे. सर्वप्रथम मुंबई व दिल्ली या महानगरांत रुग्णसंख्येचा स्फोट झाला आणि आता इतर शहरांत आणि ग्रामीण भागांत रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे ही तिसरी लाट कधी ओसरणार, ओमिक्रॉन बाधितांची संख्या पीक कधी गाठणार, निर्बंधांमधून मुक्ती कधी मिळणार, असे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. या सर्वाबाबत डॉ. जोशी यांनी महत्त्वाचे मतप्रदर्शन केले.
ओमिक्रॉन (omicron) व्हेरिएंटचा दक्षिण आफ्रिका पॅटर्न भारतातही दिसून येत आहे. मुंबई आणि दिल्लीची स्थिती पाहिल्यास ते आपल्या लक्षात येईल. या दोन्ही शहरांत अचानक रुग्णसंख्येचा स्फोट झाला आणि त्याच वेगाने रुगसंख्येत घट पाहायला मिळत आहे, असे नमूद करत जोशी यांनी खूप मोठा अंदाज व्यक्त केला. मुंबईत रुग्णसंख्येने आधीच पीकचा टप्पा पार केला आहे. आता महाराष्ट्राच्या इतर भागांत फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या पीकवर जाऊ शकते. त्याचवेळी १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत देशाच्या बहुतांश भागात रुग्णसंख्या पीक गाठेल. त्यानंतर मार्च महिन्यात रुग्णसंख्येत मोठी घट होऊन करोनाची ही लाट ओसरेल व एप्रिल महिन्यात स्थिती सामान्य होऊ शकेल, देश पुन्हा निर्बंधमुक्त झालेला दिसेल, अशी आशा जोशी यांनी व्यक्त केली.
जोशी म्हणाले…
– ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या घटल्यानंतर भारतातील करोनाची तिसरी लाट ओसरेल. फक्त डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण अजूनही आढळत आहेत. त्यामुळे थोडीशी डोकेदुखी निर्माण होऊ शकते.
– करोनाचा कोणताही नवा व्हेरिएंट येत्या काळात आला नाही तर स्थिती वेगाने सुधारेल. अपेक्षेप्रमाणे सगळं काही घडलं तर आपल्याला निश्चितपणे लवकरच निर्बंधमुक्त जीवन जगता येईल.