कोल्हापुरात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा एकदा चिंताजनक

कोल्हापुरात कोरोना रुग्णसंख्येचा (corona cases) आकडा पुन्हा एकदा चिंताजनक वळण घेऊ पाहतो आहे. सध्या शासन स्तरावरून प्रसिद्ध करण्यात येत असलेली आकडेवारी आणि निर्बंधाचे स्वरूप पाहता दिलासादायक चित्र दिसत असले, तरी शासनाचे कमी कोरोना चाचण्यांचे धोरण त्याला कारणीभूत आहे. समाजात वेगाने पसरणार्‍या या विषाणूचा वेध घेता बाधित रुग्णसंख्येचा आकडा त्याहूनही मोठा असल्याचे वैद्यकीय अभ्यासकांचे मत आहे. या स्थितीतही नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तथापि, तिसर्‍या लाटेत धुमाकूळ घालत असलेल्या या विषाणूविषयी सतर्क राहण्याची गरज असून, योग्यवेळी वैद्यकीय उपचाराची मदत घेतली, तर तिसर्‍या लाटेलाही आपण लीलया परतवू शकतो, असा दिलासा तज्ज्ञांनी दिला आहे.

कोल्हापुरात मंगळवारी कोरोनाचे 387 नवे रुग्ण दाखल झाले. यासाठी 1 हजार 525 संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या. याचा अर्थ कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा दर 25.37 टक्क्यांवर आहे.

देशात सध्या ओमायक्रॉन डेल्टाची जागा घेतो आहे, यावर एकवाक्यता होऊ लागली आहे. ओमायक्रॉन वेग किती आहे, याचा कोल्हापूरच्या रुग्णसंख्येवरून अंदाज घेता येऊ शकतो. कोल्हापुरात नोव्हेंबरमध्ये कोरोना उतरणीच्या टोकावर होता. 1 डिसेंबरपासून 18 जानेवारीपर्यंत 47 दिवसांत कोल्हापुरात 3 हजार 744 नवे रुग्ण तयार झाले. त्यातील जानेवारीच्या पहिल्या 17 दिवसांत निदान झालेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 498 इतकी आहे. सुदैवाने गेल्या 47 दिवसांमध्ये मृत्यूंची संख्या वाढली नाही. 13 मृत्यू नोंदविले गेले. त्यातील बहुतेक वृद्ध आणि अन्य आजारांनी ग्रस्त (कोमॉर्बिड) असल्याने चिंतेता एक पदर हलका झाला असला, तरी नागरिकांनी बेफिकीर राहणे त्यांच्या अंगलट येऊ शकते.

कोल्हापुरात 18 जानेवारीअखेर 3 हजार 44 रुग्ण (corona cases) उपचार घेत आहेत. यापैकी अवघे 221 रुग्णालयात आहेत. बाकी सर्व घरांतच उपचार घेत आहेत. या 221 रुग्णांपैकी व्हेंटिलेटरवर असणार्‍या रुग्णांची संख्या 8 आहे. त्यातही वृद्ध आणि कोमॉर्बिड रुग्ण अधिक आहेत. विशेष म्हणजे यातील बरेच रुग्ण कोरोनाच्या लक्षणाच्या तक्रारींवरून रुग्णालयात आले नव्हते. अन्य आजारांवरील उपचारंसाठी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आल्याने त्याची नोंद झाली. उर्वरित रुग्णांमध्ये सर्दी, घसा खवखवणे-दुखणे आणि क्वचितप्रसंगी ताप अशी लक्षणे आहेत. या लक्षणांच्या रुग्णांनी स्वतःला अलग करणे, निरीक्षण करणे आणि लक्षणे बळावल्यास वैद्यकीय सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे. हे सूत्र वापरले, तर ओमायक्रॉनबरोबरही दोन हात करणे अवघड नाही.

जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा 400 चा टप्पा ओलांडून पुढे निघाला असला, तरी नागरिकांमध्ये हवे तितके गांभीर्य दिसत नाही. ज्यांना नकळत बाधा झाली आहे, असे रुग्णही समाजात वावरताना दिसताहेत. ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग मोठा असल्याने अशा रुग्णांमुळे संसर्ग फैलावतो आहे. या रुग्णांमधील 6 ते 7 टक्के रुग्णांना लागणारी रुग्णालयाची मदत आणि त्यातून काही मृत्यू यांचा लोकसंख्येच्या प्रमाणात विचार केला, तर हे मृत्यू परवडणारे नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *