जोतिबा डोंगर : चैत्र यात्रेसाठी प्रशासन सज्ज
चैत्र महिन्यातील दुसरा रविवार असल्याने जोतिबा डोंगर रविवारी भाविकांनी फुलून गेला होता. चैत्र यात्रेसाठी दर्शन व्यवस्थेची रंगीत तालीम घेताना प्रशासन दिसून येत आहे. यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
दरम्यान, पहाटे चार वाजता घंटानाद झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले. पाद्यपूजा व काकड आरती सोहळा पार पडला. सकाळी आठ वाजता ‘श्रीं’ना अभिषेक घालण्यात आला. रामनवमीनिमित्त जोतिबाची श्रीराम अवतारातील महापूजा बांधण्यात आली. सायंकाळी ‘श्रीं’चा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. दिवसभरात अनेक सासनकाठ्या वाजतगाजत मंदिरात दाखल झाल्या. आज हजारो भाविकांनी जोतिबाचे दर्शन घेतले.
रविवारी रामनवमी असल्याने जोतिबा मंदिरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा केला. यावेळी प्रांताधिकारी अमोल माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, देवस्थान सचिव शिवराज नायकवडे, इन्चार्ज दीपक म्हेतर, सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, पुजारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलेल्या आवाहनानुसार आज मंदिर परिसरात स्वछता मोहीम राबविण्यात आली.