राज ठाकरेंनी बोलावलेली बैठक संपली
मशिदीवरील भोंग्याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी भूमिका घेतल्यामुळे मनसेत बोंबाबोब सुरू आहे. पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना पदावरून काढल्यानंतर आज मनसेच्या बैठकीला मुंबईत हजर होते. राज ठाकरे यांच्यासोबत वसंत मोरे यांची (Vasant More meet Raj Thackery) चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. पण, निर्णय काय घ्यायचा हे वसंत मोरे यांच्यावर सोपवण्यात आले आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे काढण्याची भूमिका जाहीर केली होती. एवढंच नाहीतर मोठाले स्पीकर लावून हनुमान चालिसा चालवण्याचे आदेशही राज ठाकरेंनी दिले होते. पण, त्यांच्या या निर्णयाला वसंत मोरेंनी स्पष्ट विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या राज ठाकरेंनी वसंत मोरे यांची शहराध्यपदावरून हकालपट्टी केली. वसंत मोरे यांच्यावर कारवाई झाल्यामुळे मनसेत खळबळ उडाली होती.
त्यानंतर आज राज ठाकरेंनी आपल्या निवासस्थानी शिवतीर्थावर बैठक बोलावली होती. या बैठकीला वसंत मोरे हजर होते. विशेष म्हणजे, वसंत मोरे हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे राज ठाकरेंनी तातडीने डॅमेज कंट्रोल करण्यात सुरुवात केली. याचा भागच म्हणून आजची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीनंतर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. ‘आज वसंत मोरे बैठकीसाठी हजर झाले. नुकतीच त्यांची बैठक संपलेली आहे. बैठकीत जे काही होईल ते स्वतः वसंत मोरे सांगतील. मी अन्य बैठकीसाठी आलो होतो. त्यामुळे मी यावर भाष्य करणार नाही. आमच्या नेत्यांमध्ये याबाबत नाराजी नाही राज ठाकरे स्वत: यावर बोलतील, अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी दिली.
ठाण्यात होणारी उत्तर सभा ही गुढीपाडव्याला झालेली सभा आणि त्यानंतर झालेले वाद-विवाद यांना सर्वांना चौक उत्तर दिले जाईल, असंही सरदेसाई यांनी सांगितलं.
‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला झाला. कोणत्याही हल्ल्याचे मी समर्थन करणार नाही. निश्चित ते चुकीचेच होते. यातून चौकशी करून सत्य समोर येईल पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलीस योग्य ती कारवाई करतील’ असंही देसाई म्हणाले.