किराणासह सर्वच वस्तू महागणार!
आधीच बसलेली युक्रेन-रशिया युद्धाची झळ, इंधन दरवाढीने वाहतूकदारांनी वाढवलेले दर आणि आता मुंबईत हमालीमध्ये झालेली दुप्पट वाढ यामुळे सर्वच वस्तूंच्या दरात वाढ करण्याचा निर्णय व्यापार्यांनी घेतला आहे. महिनाभरात किराणा (Grocery) सामानासह सर्वच वस्तूंचे दर 12 ते 15 टक्क्यांनी वाढतील, अशी माहिती चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड (सीएएमआयटी)चे सचिव मितेश मोदी यांनी दिली.
मुंबईत बहुतांश गोदामे जुन्या इमारतींमधील पहिल्या किंवा दुसर्या मजल्यावर आहेत. त्याठिकाणी पूर्वी 10 रुपयांत बॉक्स चढ-उतार करणार्या माथाडींकडून हमालीपोटी 23 रुपये आकारले जात आहेत. दुसरीकडे वाहतुकीचा खर्चही वाढला. अशा परिस्थितीत जेएनपीटीवरून मुंबईत येणार्या कच्च्या मालासह इतर वस्तूंच्या किमतीत वाढ करण्याशिवाय व्यापार्यांजवळ दुसरा उपाय नाही, असे मोदी म्हणाले.
किराणा महागणार
वाहतूक खर्च, हमाली आणि दुकानांतील कामगारांची पगारवाढ अशा सर्वच कारणांमुळे किराणा (Grocery) मालाच्या किमतीत वाढ करण्यावाचून दुसरा पर्याय नाही. गव्हाच्या किंमतीत किलोमागे 2 ते 3 रुपयांची वाढ केली आहे. बासमती तांदूळच्या किंमतीत आथा 80 रुपयांवरून 85, तर 90 रुपयांवरून 100 रुपयांपर्यंत वाढ केली जाईल. बासमती तुकडा 1 ते 2 रुपये प्रति किलोने वाढवण्यात आल्या आहेत. याशिवाय खाद्यतेलांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे बॉम्बे ग्रेन डीलर्स असोसिएशन अध्यक्ष रमणिकलाल छेडा यांनी सांगितले.
पेट्रोल-डिझेलचा भडका दरदिवसाआड उडत असताना मालवाहू वाहनांच्या सुट्या भागांसह, टायर, बॅटरी आदी साहित्यही महागल्याने स्थानिक स्तरावर 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाहतूक खर्चात वाढ करण्याचा निर्णय बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने घेतला आहे.
ऑल इंडिया इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेन व रशिया युद्धामुळे आधीच रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. त्यात आयात होणार्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीत वाढ होत आहे.
सेमी कंडक्टरचा तुटवडा असल्याने ऑटोमोबाईल क्षेत्रासह संपर्क यंत्रणेत वापरण्यात येणार्या इलेक्ट्रॉनिक पार्टचे आयात शुल्क भरमसाठ वाढले आहे. त्यामुळे संगणकासह, मोबाईल, लॅपटॉप, टीव्हीसह सर्वच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादन खर्चात वाढ होत असून ग्राहकांना येत्या महिन्याभरात या महागाईचे चटके जाणवतील, असेही संघटनेने सांगितले.
* आधीच युद्धाची झळ, त्यात इंधन दरवाढीचा सततचा भडका
* मुंबईत हमालीही महागली
* किराणा सामानापासून खुर्च्या, टेबल, रॅक अशा वस्तूही महागणार
* मालवाहतुकीच्या दरवाढीलाही संघटनेची मंजुरी