कोल्हापूर प्रशासन सज्ज; पथके झाली रवाना
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी 357 मतदान केंद्रांवर 2 लाख 91 हजार 539 मतदारांचे मतदान (voting) होणार आहे. या मतदानासाठी विवेकानंद महाविद्यालयाच्या पटागंणावरून सोमवारी सकाळी मतदान पथके रवाना झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुतांशी सर्वच मतदान केंद्रांवर मतदान कक्षाची तयारी पूर्ण झाली होती.
आज सकाळी आठ वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सील करून ठेवलेली ‘ईव्हीएम’ बाहेर काढण्यात आली. कोणते पथक कोणत्या मतदान केंद्रांवर जाईल, हे जाहीर करण्यात आले. यानंतर संबंधित मतदान केंद्रांसाठी कोणते ईव्हीएम आहे, त्यानुसार त्या पथकांकडे ईव्हीएम सोपविण्यात आली. पथकातील सर्व अधिकारी, कर्मचारी एकत्र आल्यानंतर, सर्व साहित्य प्राप्त झाल्यानंतर ही पथके एस.टी. आणि केएमटी बसेसमधून मतदान केंद्रांकडे रवाना झाली. ही सर्व प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे, रंजना बिचकर, अर्चना कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
मतदान केंद्रांत पोहोचल्यानंतर केंद्रातील आवश्यक ती मांडणी करण्यात आली. त्याचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाला देण्यात आला. सर्व मतदान पथके वेळेत आणि सुरळीत मतदान केंद्रांवर पोहोचली. दोन कर्मचार्यांचा रक्तदाब वाढला, त्यांच्या जागी राखीवमधील कर्मचार्यांची तत्काळ नियुक्ती करण्यात आली.
603 जणांचे टपाली मतदान
या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्यात प्रथमच 80 वर्षांवरील वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना टपाली मतदानाची (मतदान कर्मचार्यांच्या सहकार्याने घरीच मतदान (voting) करण्याची) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पद्धतीने टपाली मतदानासाठी 688 मतदार पात्र ठरले होते. त्यांच्यासाठी दि.5 ते दि.11 एप्रिल अशी मतदान प्रक्रिया राबविली. 688 मतदारांपैकी 603 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हे टपाली मतदान 87 टक्के इतके झाले. उर्वरित मतदारांपैकी काहींचा मृत्यू झाल्याचे तसेच काहीजण रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही समोर आले. दरम्यान, सैनिकांचे 95 इतके मतदान आहे. त्यापैकी सोमवारअखेर दोन मतदान निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहे.
सकाळच्या सत्रात लवकर मतदान करा सध्या हवेत उष्मा आहे, पावसाचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दुपारनंतर मतदानासाठी येणार्या मतदारांना ऊन अथवा पाऊस यामुळे मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी अडथळा येऊ नये, याकरिता मतदारांनी सकाळच्या सत्रात मतदान करा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मतदान केंद्रांची तातडीने दुरुस्ती
एका मतदान केंद्रावर मतदान कर्मचार्यांचे पथक पोहोचल्यानंतर त्या केंद्राचे छत नादुरुस्त आढळून आले. ही माहिती मिळताच महापालिकेच्या पथकाने युद्धपातळीवर काम करत ते छत तातडीने दुरुस्त केले.
एकूण मतदान केंद्रे : 357
संवेदनशील मतदान केंद्रे : 4
वेब कास्टिंग केंद्रे : 181
व्हिडीओ शूटिंग केंद्रे : 67
पिंक मतदान केंद्र : 1
एकूण मतदान कर्मचारी : 2,400
एकूण ईव्हीएम : 1,541
बॅलेट युनिट (बीयू) : 502
कंट्रोल युनिट (सीयू) : 502
व्हीव्हीपॅट मशिन : 537
एकूण मतदार : 2,91,539
महिला मतदार : 1,45,901
पुरुष मतदार : 1,45,626
तृतीयपंथी मतदार : 12
प्रथमच मतदान करणारे : 2,941
मतदारसंघात आज सार्वजनिक सुट्टी
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. या मतदानानिमित्त मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी मतदारसंघातील जे मतदार कामानिमित्त कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांनादेखील लागू राहील. केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.