माझ्यावरील कारवाईसाठी राऊतांनी गृहमंत्र्यांवर दबाव आणला; दरेकरांचा गौप्यस्फोट
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना आज मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मजुर प्रकरणी दरेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, त्यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारच्या दबावाखाली हे षडयंत्र रचलं होत. खासदार संजय राऊत यांनी या कारवाईसाठी पुढाकार घेऊन गृहमंत्र्यांवर दबाव आणला, अशी खोचक टीका त्यांनी महाविकास आघाडी सरकावर केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांचे तोंड भरुन कौतुक केले.किरीट सोमय्या पोलिसांच्या चौकशीला सामोरे का जात नाहीत, यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, सोमय्यांवरील कारवाईचे काम हे पोलिसांच्या दबावाखाली सुरू आहे. सोमय्या हे धाडसी नेते आहेत. सत्ताधाऱ्यांचे अनेक घोटाळे त्यांनी समोर आणले आहेत. मात्र ते सरकार विरुद्ध बोलल्याने त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीकडून माझ्यावरही कारवाईचा ससेमिरा लावला, परंतु हा दबाव न्यायालयाने फेटाळून लावला असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.पुढे ते म्हणाले, किरीट सोमय्या हे पळून जाणारे नेता नाहीत तर इतरांना पळवणारे नेते आहेत. कायदेशीर कारवाईच्या कामात ते असल्याने ते चौकशीला सोमोरे जात नसतली. मात्र आवश्यकता वाटली तर स्वतःहून ते पोलिसांच्या चौकशीला सामोरे जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. संजय राऊतांचा एक अजेंडा आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा एखादा नेता तुरुंगात जात नाही तोपर्यंत राऊतांना झोप लागणार नाही. केवळ दहशत माजवण्याचा उद्देशाने सरकारने आणि पोलिसांनी त्यांना त्रास दिला आहे. सोमय्यांनी अनेकांचे घोटाळे बाहेर काढले आहेत. ज्यावेळी आरोप, टीका होते तेव्हा घाबरायचं कारण नाही. ते धाडसी आहेत त्यामुळे ते कुठेही पळुन जाणार नाहीत. लवकरच ते पोलिसांच्या चौकशीला सामोरे जातील आम्हाला विश्वासही यावेळी दरेकरांनी व्यक्त केला.