सोमय्यांना मोठा झटका, आर्थिक गुन्हे शाखेची टीम घरी दाखल
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणीत वाढ करणारी बातमी समोर आली आहे. कारण आर्थिक गुन्हे शाखेची टीम थेट सोमय्या यांच्या घरावर दाखल झाली आहे. तसेच EOWचे अधिकारी अचानक किरीट सोमय्या यांच्या घरी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण अधिकारी जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा सोमय्यांचं घर बंद होतं. तिथे किरीट सोमय्या नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्यावर नोटीस लावली आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या यांचा जामीन फेटाळला आहे. त्यानंतर सोमय्या यांच्यासोबत अनपेक्षित आणि अडचणीत आणणाऱ्या घटनाच घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर सोमय्या हे नॉट रिचेबल होते. पण त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत आपल्यावरील सर्व आरोपांचं खंडन केलं होतं. मात्र, ते अद्यापही प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आज दुपारी किरीट सोमय्या यांच्या घरी गेले. पण सोमय्या यांच्या घराला कुलूप होतं. सोमय्या घरात नव्हते. त्यामुळे सोमय्या नेमके गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
पोलिसांनी याआधी INS विक्रांत घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. पण सोमय्या पिता-पुत्र चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. सोमय्या यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने सोमय्या पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन स्वीकारला नाही. त्यामुळे सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या सर्व घडामोडींनंतर EOWचे अधिकारी आज सोमय्या यांच्या कार्यालयावर दाखल झाले. तिथे सोमय्या पिता-पुत्र नव्हते. तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांकडे अधिकाऱ्यांनी नोटीस दिली. या नोटीसमध्ये 13 एप्रिलला म्हणजेच उद्या EOWच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अधिकारी सोमय्या पिता-पुत्रांच्या घरीदेखील गेले. तिथे सोमय्या पिता-पुत्र नसल्याने अधिकाऱ्यांनी घराच्या दरवाज्यावर नोटीस लावली.
शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमैयांवर आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत.
INS विक्रांत निधी अपहार प्रकरणी किरीट सोमैया आणि त्यांचे सुपुत्र निल सोमय्या यांना समन्स बजावण्यात आला होता. त्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी सोमय्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी करत न्यायालयाने सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे अटकेपासून कुठलेही संरक्षण न दिल्याने सोमय्या यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, मुंबई पोलीस किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचा शोध घेत असून ते दोघेही अद्याप हाती लागले नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.