शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाची आरएसएसला अडचण?
राज्यात शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) यांच्यातील संघर्ष टोकाला गेलेला असतानाच आणखी एक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) दादर शाखेने शिवाजी पार्क येथे शाखा भरवण्यासाठी वेगळा भूखंड देण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. तसेच आमच्या सध्याच्या VLT भूखंडाजवळ बाळासाहेब ठाकरेंचे स्मृतीस्थळ आल्यामुळे आम्हाला आमच्या ताब्यातील VLT भूखंडावर आमचे उपक्रम राबविण्यास अडचणी येत आहेत, असे संघाचे म्हणणे आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुंबई मनपाला दिले आहे जी/ उत्तर विभाग दादर (प) शिवाजी पार्क येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या नावे व्ही.एल.टी. तत्वावर १७५५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या मोकळ्या भूखंडाचा भाडेपट्टा वर्ष १९६७ पासून महापालिकेने दिलेला आहे. वर्ष १९६७ पासून वर्ष २००७ पर्यंत आम्ही मोकळ्या भूखंडाच्या भाडेपट्ट्याचे भूभाडे (VLT RENT) भरलेले आहे. त्याच्या पावत्या सोबत जोडत आहोत. प्रशासकीय अधिकारी (मालमत्ता) जी/ उत्तर विभाग यांनी वर्ष २००८ पासून भूभाडे घेण्यापूर्वी जागेचे आरेखन करण्यासाठी आग्रह धरल्याने व प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आजतागायत जागेचे आरेखन न झाल्याने प्रशासकीय कारणास्तव वर्ष २००८ पासून आजतागायत भूभाडे थकीत आहे. आम्ही हे भूभाडे भरण्यास तयार आहोत व यापूर्वीही वारंवार भूभाडे भरण्यासाठी प्रशासकीय अधिकारी (मालमत्ता) जी/ उत्तर विभाग यांच्याकडे गेलो असता ते आरेखनाशिवाय स्विकारण्यास असमर्थता दर्शवली. या एकाच कारणामुळे भूभाडे थकीत राहिले आहे..
वर्ष १९३६ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दैनंदिन शाखा शिवाजी पार्क मैदानात लागते. वर्ष १९६७ पासून VLT भूखंड राष्ट्रीय स्वयंसेवक संघास वितरित केलेला आहे. या १७५५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या मोकळ्या भूखंडाचे भूभाडे वर्ष २००७ पर्यंत भरलेले आहे. या व्ही.एल.टी. भूखंडाचा मालमत्ता कर ०१.०४.१९६७ पासून वर्ष २०२१-२२ पर्यंत भरलेला आहे. याबाबत कागदपत्रे सोबत जोडीत आहोत.
आमच्या सध्याच्या VLT भूखंडाजवळ स्मृतीस्थळ आल्यामुळे आम्हाला आमच्या ताब्यातील VLT भूखंडावर आमचे उपक्रम राबविण्यास अडचणी येत आहेत. तसेच स्मृती स्थळामुळे जागेचे आरेखन करणे जिकीरीचे होईल असे वाटते. वरील वस्तुस्थिती लक्षात घेता आम्ही आपणांस विनंती करतो की,
१) सदर जागेचे थकीत भूभाडे (VLT RENT) तातडीने स्वीकारण्यात यावे.
२) स्मृती स्थळाची वाढती व्याप्ती लक्षात घेता सदर भूभागाऐवजी शिवाजी पार्क मैदानाजवळील नाना नानी पार्क जवळील मोकळा पर्यायी भूखंड भाडेपट्ट्यावर जागेचे आरेखन करून देण्यात यावा, अशी मागणी आरएसएसकडून करण्यात आली आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
आरएसएसचे पत्र अजून मला मिळाले नाही. महानगरपालिकेकडून कागदपत्र बघून निर्णय घेण्यात येईल. आरएसएस हे एकाच नाण्याची दुसरी बाजू आहे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.