तुरुकवाडी घाटात प्रवाशी, वाहनचालकांत भीतीचे वातावरण
येथील घाटात गव्यांच्या कळपाचे (Bison) दिवसाही दर्शन होत असल्याने प्रवाशी, वाहनचालकांत भीतीचे वातावरण (Atmosphere of Fear) निर्माण झाले आहे.
तुरुकवाडी, शाहिरवाडी, आगलावेवाडी, कर्नाळेवाडी, कोतोली धनगरवाडा येथे गव्यांचे कळप आहेत. गव्यांचे दिवसाही दर्शन होत आहे. कोतोली, तुरुकवाडी परिसरातील ऊस, मका आदी पिके रातोरात गव्यांकडून फस्त केली जात आहेत. मका पिकाचा फडशा पाडला जात आहे. पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना केल्या. मात्र, गव्यांचे कळप दाद देत नाहीत. दिवसा वानर, माकड तर रात्री गवा, डुक्कर, साळींद्र आदी रानटी प्राण्यांचा उपद्रव वाढत आहे.
हातातोंडाशी आलेले पीक रात्रीत नष्ट होत असल्याने शेतकरी पुरता हबकला आहे. शाहिरवाडी, सोनारवाडी, माळेवाडी, तुरुकवाडी येथील शेतकऱ्यांनी वारणा उजवा कालव्यावरील क्षेत्रात पिकेच घेणे थांबविले आहे. तुरुकवाडी घाटात तर गव्यांचा कळपच आहे. रस्त्यालगतच गव्यांचा ( Bison) कळप वावरत असल्याने प्रवाशांना रामभरोसे प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
गव्यांपासून शेतीचे नुकसान टळावे या उद्देशाने वनविभागाने तुरुकवाडी घाटालगत चर खोदली मात्र, पावसाने एकाच महिन्यात ती बुजली. त्याऐवजी कमी खर्चात तारेच्या कुंपणापासून पिकांचे संरक्षण झाले असते.
– हंबीरराव पाटील, शेतकरी शाहिरवाडी
कोतोली परिसरातील शासकीय, खासगी वनांना काही लोकांनी वणवे लावल्यामुळे चारा नष्ट झाला आहे. पाणवठे कोरडे पडल्याने वन्यजीव चारा, पाण्याच्या शोधासाठी मानवीवस्तीकडे वळले आहेत.
– सौ. कांबळे वनरक्षक, शाहूवाडी