आकडेमोड केली जात आहे, शनिवारी गुलाल आमचाच..!
(political news) गेला महिनाभर पोटनिवडणुकीची धामधूम सुरू होती. नेत्यांच्या ईर्ष्येपोटी समर्थक, कार्यकर्त्यांनी अक्षरशः पायाला भिंगरी बांधली होती. घरदार विसरून रात्रंदिवस राबता सुरू होता. अखेर मंगळवारी मतदान झाले अन् कार्यकर्ते रिलॅक्स मोडवर आले. आता आकडेमोड सुरू झाली असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही उत्साही समर्थकांनी विजयी मिरवणूक आणि जल्लोषाचेही नियोजन केले आहे.
काँग्रेसचे आ. चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लागली. बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न झाले. परंतु; ते फोल ठरले. परिणामी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात काटाजोड लढत झाली. महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या जयश्री जाधव, तर भाजपकडून सत्यजित कदम रिंगणात उतरले.
परंतु खरी लढत पालकमंत्री सतेज पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातच झाली. दोघांनीसुद्धा ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्याने कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे रणांगण माजले. राज्यभरातील नेतेमंडळींच्या सभांनी प्रचंड अटीतटीने निवडणूक झाली. वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप झाले. शह-काटशहाचे राजकारण जिल्ह्याने अनुभवले.
निवडणुकीसाठी रात्रीचा दिवस केल्याने महाविकास आघाडी व भाजप या दोन्हींचे समर्थक आणि कार्यकर्ते विजयाचा दावा करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत आमचाच विजय होणार, असे ठणकावून सांगत आहेत. त्यासाठी कुठली पेठ आमच्याकडे… कुणाचे मतदान आम्हाला झाले… हेही सांगण्यास ते विसरत नाहीत. आमचा उमेदवार किती मताधिक्याने निवडून येणार, याचा आकडाही कार्यकर्ते छातीठोकपणे सांगत आहेत. त्यासाठी पेठा, गल्ल्या, पक्ष, समाज, व्यावसायिक अशा पद्धतींने मतदानाची गणिते मांडली जात आहेत. त्याच्या आधारे विजयासाठीची आकडेमोड केली जात आहे. शनिवारी गुलाल आमचाच..! असेही कार्यकर्ते सांगत आहेत. (political news)
नेत्यांच्या ईर्ष्येसाठी कार्यकर्त्यांची लगबग
नेत्यांच्या ईर्ष्येसाठी कार्यकर्तेही रात्रंदिवस झटताना दिसत होते. अक्षरशः रात्रीचा दिवस करत होते. शेवटचे दोन दिवस तर समर्थक कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून इमाने इतबारे राबले. मतदान केंद्राबाहेर बूथ लावण्यापासून काम सुरू होते. मंगळवारी मतदानाच्या दिवशीही मतदारांना बाहेर काढण्यापासून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणे, याद्या पाहून आपल्या पक्षाला मानणारे आणखी कोण मतदान करायचे राहिले काय? याचा कार्यकर्ते उन्हातान्हात शोध घेत होते. विशेषतः पक्षीय पातळीवर एकगठ्ठा मतदानासाठी प्रयत्न केले जात होते. सायंकाळपर्यंत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची ही लगबग सुरू होती. रात्री आठनंतर मात्र कार्यकर्ते निवांत झाले.