मुख्यमंत्रिपदाचा फेव्हिकॉल लागल्याने शिवसेना सत्तेतून बाहेर पडत नाही
महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला फेव्हिकॉल लागल्याने शिवसेना सत्तेतून बाहेर पडत नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते पत्रकारांशी बोलत होते.
राज ठाकरे यांनी मांडलेला मुद्दा भाजप आणि आरएसएसचा पूर्वीचाच अजेंडा आहे. हिंदुत्व हा भाजपचा श्वास आणि आत्मा आहे. बाबरी आम्हीच उतरवली. काश्मीर प्रश्नाचे श्रेय अनेक जण घेत आहेत. ते घ्यावे; कारण हे सर्व मुद्दे सर्वांचे होणे आरएसएसला अपेक्षित होते, असेही पाटील म्हणाले. हे मुद्दे शिवसेना, मनसे यांनीच लावून धरले पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ते करणार नाही. सध्याच्या हिंदुत्वाच्या मांडणीत मुस्लिमांचे लांगुलचालनही नाही आणि त्यांच्यावर आक्रमणही नाही, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीने खोटी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यवस्था विकसित केली आहे. अजित पवार, जितेंद्र आव्हाड विविध ठिकाणी एकच भाष्य करायचे. त्यामध्ये आता आदित्य ठाकरे सामील झाले आहेत, असे सांगून पाटील यांनी राज ठाकरे भाजपची टीम नाही. ते स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असल्याचे स्पष्ट केले.
मेहबुबा मुफ्ती यांची भूमिका बदलली तेव्हा भाजप सत्तेतून बाहेर पडला, हे धाडस शिवसेनेत आहे का? असा सवाल करून ते म्हणाले की, सत्तेचा दुरुपयोग करून महाविकास आघाडी सरकार विरोधकांवर गुन्हे दाखल करत आहे. मात्र, कोर्टात गेले की, त्यांचे तोंड फुटते. आता तर भारनियमनाने सर्वच घटकांची वाईट अवस्था होणार आहे. पाणी समोर असताना वीज नसल्याने पाणी उपसा होत नाही. अक्षरश: वाट लागली आहे.
राज ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना तुमचे होते; मग तुमच्?यावर टीका होताना वाईट का वाटते? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.