कोल्हापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांच्या कामाचा आराखडा तयार

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दुसर्‍या टप्प्यात करण्यात येणार्‍या रस्त्यांच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील 3 हजार 915 किलोमीटर लांबीच्या 1 हजार 241 रस्त्यांची (road) कामे करण्यात येणार आहेत.

दुर्गम, डोंगराळ भागातील काही वाड्या -वस्त्यांमध्ये अद्यापही रस्त्यांच्या सुविधा उपलब्ध नसल्याने केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री सडक योजना सुरू करण्यात आली. त्यासाठी लावण्यात आलेल्या निकषांमध्ये काही गावांचा समावेश होऊ शकत नव्हता. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सडक योजना ही नवीन योजना ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येऊ लागली. योजनेच्या दुसर्‍या टप्प्यासाठी सर्व जिल्ह्यांतून आराखडे मागविण्यात आले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यानेही आपला आराखडा सादर केला आहे. यामध्ये 1241 रस्त्यांची कामे प्रस्तावित केली आहेत.

गावामध्ये उपलब्ध असणार्‍या सुविधांवर रस्त्यांची (road) निवड करून प्राधान्यक्रम निश्चित केला जातो. जिल्ह्याला अद्याप उद्दिष्ट प्राप्त झालेले नाही. उद्दिष्ट प्राप्त झाल्यानंतर प्राधान्यक्रमानुसार रस्त्यांची कामे सुरू करण्यात येणार आहेत. शहरालगत असणार्‍या तालुक्यातील बहुतांश गावांतील ग्रामीण रस्त्यांची जिल्हा मार्गामध्ये दर्जोन्नती करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतून करण्यात येणार्‍या रस्त्यांमध्ये दुर्गम, डोंगराळ भागातील रस्त्यांच्या संख्या अधिक असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *