”राम देव नाही, मी रामाला ओळखत नाही”, माजी मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी (Jitan Ram Manjhi Controversial Statement) हे एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. आंबेडकर जयंतीला लोकांना संबोधित करताना त्यांनी प्रभू राम यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. ”राम देव नाही. रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकी आणि तुलसीदासांवर माझा विश्वास आहे. पण, रामाला मी ओळखत नाही”, असं मांझी म्हणाले. जमुई जिल्ह्यातील सिकंदरा येथे आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होतेबिहारमधील सिकंदरा येथे हिंदूस्थानी अवाम मोर्चाच्या पक्षाचे आमदार प्रफुल्ल मांझी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये बोलताना मांझी म्हणाले, ”राम देव नव्हते. ते वाल्मिकी आणि तुलसीदासांच्या रामायणातील पात्र होते. रामावर माझा विश्वास नाही. रामाला मी ओळखत नाही. पुजा-पाठ करून कोणीही मोठं होत नाही.” अनुसूचित जातीच्या लोकांनी पूजा करणे बंद करावे, असं मांझी म्हणाले. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे.
मांझी यांनी ब्राह्मणांवर देखील निशाणा साधला. ”ब्राह्मण मांस खातात, दारू पितात आणि खोटे बोलतात. अशा ब्राह्मणांपासून दूर राहावे. त्यांची पूजा करू नये. तुम्ही लोक पूजा करणे बंद करा. रामाने शबरीची उष्टे बोरं खाल्ली होती”, असंही मांझी म्हणाले.
जीतन मांझी यांनी यापूर्वी देखील भगवान ‘राम’ यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ”राम जीवंत व्यक्ती होते हे मी मानत नाही. तसेच ते महापुरुष देखील नव्हते”, असं गेल्या सप्टेंबर महिन्यात मांझी म्हणाले होते.