ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करणार

रामनवमी हा आपला वाढदिवस आहे, हा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा संशोधनाचा विषय आहे. मात्र, यानिमित्ताने त्यांच्या जाहिरातीत हसन मुश्रीफ यांच्या नावातील अद्याक्षरे घेऊन राम असा बहुजन समाजाचे नायक प्रभू रामचंद्र यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी जाहीर केले आहे. शुक्रवार, दि. 15 रोजी कागल येथे मिरवणूक काढून हा गुन्हा (crime) दाखल करण्यासाठी घाटगे हे कागल पोलिस स्थानकात जाणार आहेत.

यासंदर्भात घाटगे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका करत याप्रकरणी मुश्रीफ हे माफी मागतील म्हणून दोन दिवस वाट पाहून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. दि. 10 एप्रिल रोजी अखंड भारताचे व बहुजन समाजाचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मदिवस आपण साजरा केला. पण या शुभदिवसाचा हसन मुश्रीफ यांनी अवमान केल्याचा आपल्याला प्रचंड राग व खंत आहे. यातच कागलचे नाव त्यांच्या आधी घेतल्याबद्दल आपण सर्वांची माफी मागतो, असेही घाटगे यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. 1954 साली रामनवमी दिवशी तिथीप्रमाणे आपला जन्म झाल्याचे मुश्रीफ म्हणतात. तो झाला की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. त्यांच्या स्वयंघोषित तिथीप्रमाणे रामनवमी निमित्ताने त्यांची दिलेली जाहिरात ही लाजीरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले.

हसन मुश्रीफ या नावात ‘स’च्या जागी ‘रा’ व ‘मु’च्या जागी ‘म’ लिहून नवमी असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याखाली नवमी असे लिहिले आहे. राम हा एकेरी उल्लेख कसा करता? प्रभू श्री रामचंद्र म्हणा, जय श्रीराम म्हणा, श्रीराम म्हणा. एकेरी उल्लेख करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? एवढे तुमचे धाडस वाढले की प्रभू श्रीराम यांचा एकेरी उलेख करता? तुम्ही एवढे मोठे कधी झाला? तुमची आणि प्रभू श्री रामचंद्रांची नवमी एक करायचा प्रयत्न करताना तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती, असेही घाटगे यांनी म्हटले आहे. तुम्हाला आत्मचिंतन करता येत नाही का? असा प्रश्न विचारून घाटगे म्हणाले की, आपण दोन दिवस वाट पाहिली.

एखाद्या वेळेस चुकून झाले असे वाटून तुम्ही माफी मागाल; पण मुश्रीफ यांनी माफी मागितली नाही. माफी मागण्याचे आवाहन करत नाही, तुम्ही पूर्ण भारताचा व बहुजन समाजाचा अपमान केला आहे. त्यांच्या श्रद्धेला ठेच पोहोचविली आहे. येत्या काळात बहुजन समाज तुम्हाला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये आपला वाटा हा सिंहाचा असेल, असे सांगून घाटगे यांनी शाहू छत्रपतींच्या जनक घराण्याचा रक्ताचा वंशज म्हणून मी स्वतः कागल पोलिस स्थानकात मुश्रीफ यांच्याविरुद्ध गुन्हा (crime) दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, शुक्रवार, दि. 15 रोजी सकाळी 9 वाजता कागल येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन मुख्य रस्त्यावरून जनसमुदायासह कागल पोलिस ठाण्यात जाऊन हा गुन्हा दाखल करण्याची तयारी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *