महावितरणच्या ट्रान्स्फॉर्मरमुळे शेतकर्याचे घर भस्मसात
तालुक्यातील जानोरी येथील शेतकरी भारत पुंडलिक वाघ यांच्या शेतातल्या ट्रान्स्फॉर्मरमध्ये जाळ होऊन ठिणगी पडल्याने आग लागली. त्यात त्यांचे घर भस्मसात झाले. भारत वाघ यांच्या शिवनई रस्त्यालगत जुने घर असून, शेतात गुरुवारी (दि. 14) सकाळी 10 वाजता महावितरण कंपनीच्या ट्रान्स्फॉर्मरमध्ये मोठा स्फोट होऊन आगीचे लोळ निर्माण झाले होते.
आगीच्या ठिणग्या गवतावर पडून घरालाही आग लागली. त्यामुळे घरात ठेवलेले शेतीचे साहित्य, द्राक्षबागेसाठी लागणारे बांबू, ड्रिपचे मटेरियल, गवताच्या गंज्या आदी साहित्य जळून खाक झाले. यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याबाबत वाघ यांनी महसूल विभागाला माहिती दिली आहे. घटनेचा पंचनामा करण्यासाठी जानोरीचे तलाठी किरण भोये, उपसरपंच गणेश तिडके, सुभाष वाघ आदींनी भेट दिली. ट्रान्स्फॉर्मरमध्ये लागलेल्या आगीमुळे महावितरण कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.