सांगली बसस्थानक बनतोय चोरट्यांचा अड्डा

थील बसस्थानकामध्ये बसमध्ये चढताना आणि उतरताना दागिने, पर्स, पैसे, मोबाईल लांबवणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातील अनेक गुन्ह्यांचा छडा अद्याप लागलेला नाही. त्यामुळे हे बसस्थानक चोरट्यांचा अड्डा बनत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मात्र, त्याचे चित्रीकरण स्पष्ट दिसत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे ‘असून अडचण नसून घोटाळा’ अशी स्थिती आहे. चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

सांगली बसस्थानकामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोर्‍यांमध्ये वाढ होत आहे. बसमध्ये चढताना किंवा उतरताना दागिने, पैसे, मोबाईल लंपास करणे असे प्रकार वाढत आहेत. काही दिवसापूर्वी बसस्थानक परिसरात एकाला मारहाण करून लुटण्यात आले होते. या घटनांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. चोरीची घटना घडल्यानंतर त्यांना सांगली शहर पोलिस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार द्यावी लागते. अनेक वेळा प्रवाशांना नेमकी चोरी कोठे झाली हे सांगता न आल्याने त्यांना ज्या ठिकाणाहून आले आहेत. त्या संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यास सांगितले जाते. काही प्रवासी तक्रार देऊन उपयोग होणार नाही, म्हणून तक्रारही देत नाहीत.
चोरी झाल्यानंतर पोलिस गुन्हा दाखल करून घेतात. या गुन्ह्याचा शोध घेतला जातो. मात्र, अनेक गुन्ह्यांचा छडा अद्याप लागलेला नाही. बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. चित्रीकरणात चोरटे स्पष्ट दिसत नाहीत, या ठिकाणी आधुनिक चांगल्या पद्धतीचे कॅमेरे बसवणे आवश्यक आहे, असे अनेक पोलिसांचे म्हणणे आहे. इचलकरंजी, हातकणंगले परिसरातील काही महिला असे गुन्हे करतात, असे पोलिसांनी सांगितले. चोरीच्या वाढत्या गुन्ह्यामुळे सांगली बसस्थानक बदनाम होत असून चोरट्यांचा अड्डा बनतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

पोलिस चौकीचा उपयोग काय
बसस्थानक परिसरात पोलिस चौकी आहे. त्या ठिकाणी 24 तास एक पोलिस असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक वेळा त्या ठिकाणी पोलिस उपस्थित नसतो. सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यापासून त्या ठिकाणी पोलिस येण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असे महामंडळाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *