पश्चिम महाराष्ट्रात ड्रग्ज तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट
केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण (एनसीबी) विभागाने सप्ताहात बंगळूर आणि मुंबईत छापेमारी करून हेरॉईनसह मेथ्याक्लॉलोन, एमडीएमए, कोकेन व ट्रोमोडोलच्या नशिल्या गोळ्या असा 62 कोटींचा अमली पदार्थ (drugs) साठा हस्तगत करून आंतरराष्ट्रीय तस्करी टोळ्यांचा पर्दाफाश केला. या कारवाईनंतर अमली पदार्थ (Drug smuggling) तस्करीतून कोट्यवधींची उलाढाल करणार्या पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील टोळ्यांचे धाबे दणाणले आहे.
दक्षिण आफ्रिका, नेपाळ, टांझानियातून बंगळूर, कोल्हापूर व्हाया पुणे, मुंबईसह राजस्थान, गुजरात व बिहारात फोफावलेले अमली पदार्थांचे तस्करी कनेक्शन उघडकीस येण्याची शक्यता आहे.
जोहान्सबर्गमधून मुंबईत हेरॉईनची तस्करी (Drug smuggling)
बंगळूरमधील कारवाईनंतर लागलीच मुंबई विमानतळावर केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण (एनसीबी) विभागाने दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या परदेशी व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून सुमारे 24 कोटींचे 3. 98 किलो हेरॉईन हस्तगत केले. संबंधित व्यक्ती जोहान्सबर्ग येथून मुंबईत दाखल झाली होती. साहित्याने भरलेल्या बॅगेत लपवून अमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रकार पथकाच्या सतर्कतेमुळे उघड झाला.
महाराष्ट्रात ड्रग्ज तस्करी फोफावली (Drug smuggling)
अमली पदार्थांच्या तस्करी आणि सेवनावर कडक निर्बंध लागू आहेत. तस्करीचे गुन्हे सिद्ध झाल्यास 10 वर्षे सक्तमजुरी आणि एक लाखापर्यंतच्या दंडाची तरतूद असतानाही महाराष्ट्रात विशेषकरून सीमाभागात बिनधास्त ड्रग्ज तस्करी सुरू आहे. 10 वर्षांत 3 लाखांवर गुन्हे दाखल झाले आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने 2009 ते 2015 या काळात दीडशेहून अधिक कोटींचे ड्रग्ज साठे हस्तगत केले आहेत. डिसेंबर 2021 पर्यंत त्यात 40 ते 45 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, मणिपूरमध्ये तस्करीचा टक्का वाढल्याचे दिसून आले आहे.
उमेदीतील तरुण बनलेत व्यसनांचे शिकार
आर्थिकदृष्ट्या दुर्बल, कमकुवत घटकांसह उच्चशिक्षित घटकातील तरुणांची ऐन उमेदीच्या काळात अमली पदार्थ सेवनामुळे फरफट होऊ लागली आहे. 17 ते 25 वयोगटातील तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता सामाजिक समस्या बनू लागली आहे. लॉकडाऊन काळात तर तस्करी टोळ्यांनी कोवळ्या वयोगटातील मुलांनाही व्यसनाधीन बनविल्याचे चित्र आहे.
मुंबई पोलिसांकडून चंदगड अड्ड्याचा पर्दाफाश
एमडी ड्रग्जचा चंदगड तालुक्यातील बहुचर्चित कारखाना गतवर्षी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने चव्हाट्यावर आणला. कुक्कुटपालन, शेळीपालन करत असल्याचा आभास निर्माण करून सूत्रधाराने ड्रग्जचा कारखाना सुरू केला होता. छापेमारीनंतर पोलिसांनी ड्रग्ज (drugs) साठ्यासह दोन कोटी 35 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
(पूर्वार्ध)
कुख्यात तस्करांचे कोल्हापुरात लागेबांधे
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांचा कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांसह सीमाभागात वावर वाढला आहे. ‘कोरोना अनलॉक’नंतर स्थानिक टोळ्यांना हाताशी धरून चरस, कोकेन, ब्राऊन शुगरसह हेरॉईनची खुलेआम तस्करी सुरू झाली आहे. गांजाची तस्करी तर नित्याची बाब बनली आहे. स्थानिक तस्करांना हाताशी धरून मोठ्या टोळ्या विस्तारत आहेत.
आंतरराष्ट्रीय टोळीचे ‘इचलकरंजी कनेक्शन’
नेपाळमधील विक्रम नरबहाद्दूर मगर ऊर्फ थापा (भुटवल) व टांझानियातील कुख्यात ड्रग्ज तस्कराला कोल्हापूर पोलिसांनी 2021 मध्ये इचलकरंजीत बेड्या ठोकून त्याच्याकडून अमली पदार्थांचा साठा हस्तगत केला होता. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा यापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यात शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले होते.