महाराष्ट्र ओशाळला! निर्वस्त्र करून महिलेचा छळ
महाराष्ट्रातील नंदुरबार हा जिल्हा ( nandurbar news ) अजूनही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागास आहे. आदिवासींची संख्या या जिल्ह्यात मोठ्या संख्येत आहे. जिल्ह्यातील कुप्रथा बंद करण्यासाठी अनेक संघटना कार्यकरत आहेत. पण अजूनही दूर्गम भागांमध्ये या कुप्रथा कायम आहेत. आता नंदुरबार जिल्ह्यातून मोठी घटना समोर आली आहे. या महिलेला निर्वस्त्र करून तिचा छळ करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामागेही एक कुप्रथाच आहे.
डाकीण असल्याच्या संशयावरुन एका महिलेला निर्वस्त्र करून तिचा छळ केल्याची अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही अत्यंत लाजीरवाणीबाब आहे. महिलेला निर्वस्त्र करून तिचा छळ करतानाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारच्या सोशल मीडियात हे व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेवरून प्रशासनावर आता जोरदार टीका होत आहे.
बोली भाषेवरून ही घटना सातपुडा पर्वत रांगामधील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत घटनेची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. ही घटना कुठली आणि संबंधीत पीडित महिला कोण? याबाबत पोलीस देखील तपास करत आहेत.
हे धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर राज्य आणि केंद्रीय महिला आयोगाकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे ‘अंनिस’ने स्पष्ट केले आहे. नंदुरबारमध्ये डाकीण प्रथेबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत आणि त्यातूनच या महिलेसोबत हा दुर्दैवी प्रकार झाल्याचे बोलल्या जात आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपासून एका महिलेचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्थानिक बोली भाषेत तीला काही प्रश्न विचारण्यात येत आहेत. यावरून तिला डाकीण संबोधण्याचा प्रकार दिसून येतोय. हा प्रकार नेमका कुठला आहे. सर्व पोलीस पाटील आणि पोलिसांचे जे खबरे असतात त्यांच्या मार्फत हा तपास करण्यात येत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे निष्पन्न झाल्यानंतर आरोपींविरुद्ध कठोर कारवाई निश्चितपणे केली जाईल, अशी माहिती धडगावचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताळे यांनी दिली.
काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एका महिलेला निर्वस्त्र करण्यात आल्याचं दिसतंय. या व्हिडिओत काही लोकं तिला चटके लावण्याचा प्रयत्न करत आहेत. तू डाकीण आहेस आणि तू कोणाकोणाला खातेस हे तिच्याकडून कबुल करून घेत आहेत. हा इतका भयंकर व्हिडिओ आहे की तो बघतानाही लाज वाटते आहे. असे एक नव्हे तर तीन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एकीकडे आपण स्त्री स्वातंत्र्याचा, तिच्या सन्माचा विचार करतो. दुसरीकडे डाकीण म्हणून स्त्री इतका प्रचंड छळ होत असेल तर हे निषेधार्ह आणि भयानक घटना आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याचा तीव्र निषेध करते, असं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे म्हणाले.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणी छडा लावला पाहिजे. पोलीस प्रशासनाचा माणून प्रत्येक गावात आणि पाड्यावर उपलब्ध आहे. ही पोलिसांची जबाबदारी आहे. आम्ही यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीही आपल्या यंत्रणेमार्फत तपास करत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे, याचा शोध घेण्यात येत आहे. राजकीय नेतृत्वाने याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. हे प्रकरण ‘अंनिस’ राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे नेणार आहे. या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्वांनी मिळून या डाकीणीच्या प्रश्नावर काम करण्याची गरज आहे. येथील स्त्रीयांना सन्मानाने जगण्याचा अधिक मिळवून देण्याची सर्वांची जबाबदारी आहे. कुठलीही स्त्री ही डाकीण नसते, हे समाजाने समजून घेतलं पाहिजे. कुठल्याही स्त्रीला डाकीण मंत्राने कुणाला खाता येत नाही किंवा मारता येत नाही. स्त्री ही निर्माण करणारी आणि निर्मिती करणारी असते. ती कुणाचा जीव घेणारी नसते हे आपण समजू घेतलं पाहिजे, असं आवाहन ‘अंनिस’ने केलं आहे.