समरजितसिंह घाटगे यांच्यावरील कारवाईसाठी हसन मुश्रीफ समर्थकांचा मोर्चा
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी कागल शहरातील राम मंदिराला राजकीय अड्डा बनवला आहे. नामदार हसन मुश्रीफ यांची जन्माच्या तारखेवरून बदनामी सुरु केली आहे, असे आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी हसन मुश्रीफ समर्थकांनी कागल पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून निषेध केला.
निषेध मोर्चाला कागल शहरातील बसस्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. समरजितसिंह घाटगे यांच्या निषेधार्थ शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रभु रामाचा जयघोष, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोषणा देत मोर्चा प्रमुख मार्गावरून पोलीस स्टेशनवर आला.
दरम्यान, प्रमुख कार्यकर्त्यांनी खर्डेकर चौकातील राम मंदिरमध्ये जाऊन, श्री रामाचे दर्शन घेतले. पोलीस स्टेशन समोर आलेला हा मोर्चा पोलिसांनी बाहेरच अडवला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आले होते.