माध्यमिक शाळेमध्ये तीन बॉम्बस्फोट, २० विद्यार्थ्यांचा मृत्यू
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील (Kabul) माध्यमिक शाळेत आत्मघातकी तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. या घटनेत २० हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.तर, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याची माहिती आहे. ज्या शाळेमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत ती हजारा समुदाय मोठ्या संख्येने असलेल्या ठिकाणी आहे. इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर हजारा समुदाय आहे, अशी माहिती देखील आहे.
अफगाणिस्तानची राजधानी आज तीन बॉम्बस्फोटांनी हादरली. काबुल पश्चिमेच्या भागातील शाळेमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले. पहिला स्फोट मुमताज एज्युकेशनल सेंटरजवळ झाला. दुसरा स्फोट अब्दुल रहीम शहीद हायस्कूलच्या समोर झाला. स्फोट झाला त्यावेळी विद्यार्थी शाळेतून बाहेर पडत होते. या घटनेत २० हूनअधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
विद्यार्थी स्कूल बसद्वारे शाळेतून बाहेर पडत असताना स्फोट करण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना आणि इतरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाही.
शिया हजारा समुदाय मोठ्या संख्येनं असलेल्या ठिकाणी हे स्फोट झाले आहेत. माध्यमिक शाळेत तीन स्फोट झाल्याची माहिती आहे. खलिद जर्दन या काबुल कमांडरच्या प्रवक्त्यानं काही जणांचा मृत्यू झाल्याचं मान्य केलं आहे.
तालिबाननं अफगाणिस्तानची सत्ता मिळवल्यानंतर देशाला सुरक्षित केलं असल्याचा दावा केला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय अधिकारी आणि विश्लेषकांनी इस्लामिक स्टेटसकडून हल्ले वाढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट सक्रीय झालं आहे. दहशतवादी संघटना शिया समुदायाला निशाणा बनवत आहे. शिया मुस्लीम समुदायाच्या मशिदीवर हल्ले केले जात आहेत.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातील काबुलमधील एका मोठ्या मशिदीवर बॉम्ब फेकण्यात आला होता. नमाज सुरु असतानाच झालेल्या हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी एका संशयिताला अटक करण्यात आली होती. आज झालेल्या स्फोटांची जबाबदारी कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाही. मात्र, शिया हजारा समुदायाविरोधात होणारे हल्ले इस्लामिक स्टेटकडून केले जात असल्याचा अंदाज आहे.