पन्हाळा : ऐतिहासिक तीन दरवाजाजवळ इतिहासप्रेमी मंडळींनी केली गर्दी

पन्हाळा येथे तीन दरवाजा जवळील बुरुज दुर्ग सेवा प्रतिष्ठान कासारवाडी टोप (ता. हातकणंगले) यांचेकडून स्वच्छता करण्यात आली. यावेळी पुन्हा या संस्थेच्या दुर्गप्रेमी मावळ्यांना बुरुजांमध्ये फुटलेला आणखी एक तोफगोळा (Artillery) आढळून आला. त्यामुळे सदरचा गोळा भिंतीतून काढण्यात आला नाही. गोळ्यांचे भिंतीतच फुटून अनेक तुकडे झाले आहेत, अशी माहिती दुर्ग सेवा प्रतिष्ठानचे रोहन चेचर यांनी दिली.

दुर्ग सेवा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत प्रत्येक सोमवारी पन्हाळा किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता केली जाते. सोमवार (दि.18) शिवदुर्ग प्रतिष्ठानचे सौरभ मुळीक, केतन सुतार, रोहन चेचरे, विकी भोसले, प्रथमेश लुगडे, कुणाल चेचरे, आर्यन चेचरे, ओंकर जाधव, हे आठ मावळे तीन दरवाजा परिसरातील एक बुरूज स्वच्छ करत होते. बुरुजावरील वाढलेली झुडपे तोडत असताना या बुरुजाच्या भिंतीत लोखंडी फुटलेला तोफगोळा आढळून आला. परंतु मावळ्यांनी सदरचा गोळा भिंतीतून बाहेर काढला नाही.

पुरातत्व विभाग पन्हाळा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आणखी एक गोळा (Artillery) भिंतीत असल्याचे निदर्शनास आणून दिल्‍याची माहिती रोहन चेचर यांनी दिली. लांब पल्ल्याच्या तोफांमधून लोखंडी तोफगोळ्याचा मार करून देखील तटबंदीमध्ये लोखंडी तोफगोळे फुटले आहेत. मात्र बुरुजाच्या भिंती अभेद्य राहिल्या आहेत, याचा हा जिवंत असा ऐतिहासिक पुरावाच आज पन्हाळागडावर सापडला आहे. आणखी एक तोफगोळा सापडल्याचे कळताच याठिकाणी इतिहासप्रेमी मंडळींनी तोफगोळा पाहण्यास गर्दी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *